मोबाइल फोन आणि इंटरनेट यांचे व्यसन युवावर्गात चिंता आणि उदासीनतेच्या भावना वृद्धिंगत करत असल्याचे नव्या संशोधनातून पुढे आले आहे.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाचा समाजात प्रसार झाला असून, त्यामागची पाश्र्वभूमी खूप मोठी असल्याचे मत इल्लिनोअस विद्यापीठाचे मानसशास्त्राचे प्राध्यापक अलेजॅन्ड्रो लिइरस यांनी म्हटले आहे, तसेच ही भीती दूरचित्रवाणी, व्हिडीओ गेम आणि सध्याच्या स्मार्टफोनसारख्या माध्यमातून पसरवली जात आहे.
संशोधकांनी विद्यापीठातील ३०० विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची चाचणी घेताना त्यांच्या स्मार्टफोनची किंमत आणि इंटरनेटच्या वापरासोबत ते संबंधित इलेक्ट्रॉनिक माध्यमाकडे वळण्यामागच्या प्रेरणेचा आढावा घेतला. या माध्यमातून त्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडित असलेले फोन आणि इंटरनेट वापराचे व्यसन आणि स्वविध्वंसक आचारणाची चाचपणी करण्याचा एकमेव उद्देश होता.
ज्या लोकांनी इंटरनेट आणि सेलफोनबाबत स्वत:ला व्यसनाधीन असल्याचे म्हटले आहे, त्यांच्यामध्ये चिंता आणि उदासीनता अधिक असल्याचे मत टायाना पानोव्हा यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसोबत केलेल्या अभ्यासातून व्यक्त केले आहे.
दरम्यान, सेलफोन किंवा इंटरनेटचा वापर आणि नकारात्मक मानसिक आरोग्याचा काहीही संबंध नसून तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ नीरसपणा कमी करण्याचे एक माध्यम असल्याचे संशोधकांना आढळून आले.
लिइरस यांच्यामते, ऑनलाइन जाण्यासाठी मिळणारी प्रेरणा हा खूप महत्त्वपूर्ण घटक असून त्याचा तंत्रज्ञानाच्या वापरातून पुढे वाढणारी चिंता आणि उदासीनतेशीदेखील संबंध आहे. या वेळी तणावपूर्ण वातावरणात सेलफोन असूनही त्याचा वापर न करणाऱ्यांचासुद्धा अभ्यास केला, तेव्हा लिइरस यांना असे आढळून आले की ज्यांना प्रायोगिक तत्त्वावर तणावपूर्ण वातावरणात सेलफोन वापरण्याची मुभा देण्यात आली होती त्यांच्यामध्ये आढळलेला नकारात्मक भावनेचा परिणाम हा सेलफोन वापरण्याची परवानगी नसलेल्यांपेक्षा किंचित जास्त असल्याचे दिसून आले.
हे संशोधन ‘कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेव्हिअर’ या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)