स्मार्टफोनच्या अतिवापराने आरोग्यास धोका निर्माण होत असला तरी त्याचा वापर आरोग्यपूरक म्हणूनही होऊ शकतो. मधुमेही रुग्णांना आता त्यांचा हा विकार स्मार्टफोनच्या मदतीने नियंत्रित करता येणार आहे. एका संशोधनानुसार शरीरातील विद्युत जाळय़ाला उद्दीपन दिल्याने मधुमेहावरील उपचारात फायदा होतो. या संशोधनानुसार अ‍ॅक्युपंक्चर तत्त्वाचा आधुनिक वापर करून हे शक्य असते. यात इलेक्ट्रोअ‍ॅक्युपंक्चरचा वापर केलेला आहे. त्याच्या जोडीला न्यूरोमॉडय़ुलेशन तंत्रही वापरले आहे. न्युरोमॉडय़ुलेशनमध्ये काही यंत्रांचा वापर करून वेदना निवारण केल्या जातात. संधिवात व सेप्सिसच्या आजारातही या पद्धतींचा उपयोग होतो. जर्नल ट्रेंड्स इन मॉलिक्युलर मेडिसीन या नियतकालिकाच्या संशोधकांनी म्हटले आहे, की चेतापेशींना उद्दीपन दिले असता मधुमेह, लठ्ठपणा, आतडय़ाचे विकार, पक्षाघात, जंतुसंसर्ग यात चांगला फायदा होतो. रूटगर्स विद्यापीठाचे लुईस उलोआ यांनी सांगितले, की आपले शरीर हे घरातील खोल्यांसारखे असते. अंधाऱ्या खोलीत गेल्यावर दिवे लावण्यासाठी विजेचे बटण दाबावे लागते तसेच हे आहे. बायोइलेक्ट्रॉनिक मेडिसीन शाखेत इलेक्ट्रोअ‍ॅक्युपंक्चरची सुधारित आवृत्ती वापरली जाते. यात काही छोटी उपकरणे शरीरात टाकली जातात, त्यामुळे फायदा होतो. पेसमेकरने जसा लोकांचा फायदा झाला तसाच यात होईल असा उलोआ यांचा दावा आहे.