स्मार्टफोनवर अधिक वेळ घालविणाऱ्या व्यक्तींच्या निद्रेवर विपरीत परिणाम होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्मार्टफोनपासून दूर राहण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.

स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक ठरत असताना त्याच्या दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागणार आहे. स्मार्टफोनच्या या अतिवापराचा झोपेवर थेट परिणाम होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. तसेच कमी झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्य हे विकार जडत असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील मॅथ्यू क्रिस्तेन्सेन यांनी सॅनफ्रॅन्सिस्कोमधील काही सहकाऱ्यांच्या साथीत हे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी ६५३ जणांची तपासणी केली. सहभागी झालेल्यांच्या स्मार्टफोनवर ठेवण्यात आलेल्या एका अ‍ॅपमुळे त्यांनी किती वेळ फोन पाहिला हे स्पष्ट होत होते. त्यानुसार ३० दिवसांची माहिती मिळविण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांचे झोपेचे तास आणि गुणवत्ताही तपासण्यात आली. जास्त काळ स्मार्टफोनचा अधिक वापर करणाऱ्यांची झोप अपुरी झाल्याचे आढळून आले, तर स्मार्टफोन कमी हाताळणाऱ्यांची झोप पुरेशी झाल्याचेही निरीक्षण संशोधकांनी मांडले. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोपेवर होणारा परिणाम तपासणारे हे पहिलेच संशोधन असून ते नुकतेच एका मासिकात प्रसिद्ध करण्यात आले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)