News Flash

स्मार्टफोनवरील ‘प्रो’ छायाचित्रण

स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याने छायाचित्रण कलेचे संदर्भ बदलून टाकले आहेत.

स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याने छायाचित्रण कलेचे संदर्भ बदलून टाकले आहेत. पूर्वी छायाचित्रण हे अवघड समजले जायचे. साधनांची कमतरता, उपकरणांचे दर, तांत्रिक प्रशिक्षणाची गरज, तांत्रिक गुंतागुंत या कारणांमुळे कोणालाही छायाचित्रण करणे सहज जमायचे नाही. मात्र मोबाइलमध्ये कॅमेऱ्याचा अंतर्भाव झाला आणि या कलेबाबतची भीती नाहीशी होत गेली. पुढे स्मार्टफोनने तर छायाचित्रणाचा मुख्य प्रवाहच आपल्याकडे खेचून आणला. स्मार्टफोनवरील कॅमेऱ्यांमध्ये होत गेलेल्या तांत्रिक सुधारणा आणि सुविधा यांमुळे डिजिटल छायाचित्रण नव्या उंचीवर पोहोचले. हजारो रुपयांत मिळणाऱ्या डीएसएलआर कॅमेऱ्यांसारखी नसली तरी, स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांतून काढली जाणारी छायाचित्रे दर्जेदार असतात, हे नक्की. डय़ुअल, ट्रिपल कॅमेऱ्यांच्या लेन्समुळे छायाचित्रण तांत्रिकदृष्टय़ा अधिक प्रगत करण्याकडे स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांचा कल असतो. त्यामुळे अगदी लहान वयातील मूलही हातातील स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचे एक बटण काढून चांगले छायाचित्र टिपू शकतो.

एकीकडे कॅमेऱ्यांतील प्रगतीमुळे त्याद्वारे केले जाणारे छायाचित्रण सहजसुलभ आणि सुंदर झाले आहे तर दुसरीकडे, स्मार्टफोनमधील ‘फोटो एडिटिंग’ अ‍ॅपनी ती छायाचित्रे उत्तम करणे सोयीस्कर केले आहे. असे असले तरी, स्मार्टफोन कॅमेऱ्यांतील एक घटक अजूनही दुर्लक्षित किंवा सामान्यांसाठी अपरिचित राहिला आहे. तो म्हणजे यातील ‘प्रो मोड’. तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो, व्हिडीओ, बोकेह, पोट्रेट, पॅनोरामा असे प्रकार (मोड) असतात, तसाच ‘प्रो’ मोडही असतो. या ‘प्रो मोड’वर क्लिक केल्यावर आतमध्ये सेटिंगचे नवे दालन उघडते. सामान्यपणे त्यात वेगवेगळ्या बटणांशी संलग्न चकत्या (डायल) दिसतात. ज्यांना हा प्रो मोड माहीत नाही त्यांनी अजाणतेपणी हा प्रकार हाताळून पाहिला असेल तर ती चकती फिरवल्यानंतर कॅमेऱ्यावरील दृश्याच्या प्रकाश आणि फोकस यांमध्ये होणारा फरक त्यांच्या लक्षात आला असेल. मात्र ही सगळी गुंतागुंत पाहूनच अनेकांनी ‘प्रो मोड’मधून ‘पळ’ काढला असेल.

स्मार्टफोन कॅमेऱ्यांत अगदी सुरुवातीपासून असतानाही आजवर फार परिचित नसलेल्या या ‘प्रो मोड’शी तुमची ओळख झाली की तुम्ही करत असलेले छायाचित्रण नव्या उंचीवर पोहोचू शकते. या ‘प्रो मोड’मध्ये आयएसओ, व्हाइट बॅलन्स, शटर स्पीड, ऑटो फोकस ही प्रमुख बटणे आढळतात. या प्रत्येक बटणाद्वारे तुम्ही कॅमेऱ्यातील सेटिंग बदलून अधिक प्रभावी छायाचित्रण करू शकता. त्यासाठीच ‘प्रो मोड’बद्दल थोडक्यात माहिती आज देत आहोत.

‘शटरस्पीड’ किंवा ‘शटरटाइम’

‘शटरस्पीड’ म्हणजे ज्या वेगाने तुमचा कॅमेरा एखादे छायाचित्र टिपतो, तो वेग. सर्वसाधारणपणे आपल्या मोबाइलमधील कॅमेरा प्रत्येक छायाचित्रणापूर्वी आपोआप ‘शटरस्पीड’ निश्चित करत असतो. ‘१/१२५’ हा शटरस्पीड सर्वसाधारणपणे योग्य मानला जातो आणि त्याद्वारे बहुतांश छायाचित्रण करता येते. मात्र तुम्ही एखाद्या हलत्या, धावत्या वस्तूचे छायाचित्रण करत असाल तर हा ‘शटरस्पीड’ वाढवावा लागेल. जेणेकरून वेगाने हलणारी ती वस्तू कॅमेरा तितक्याच वेगाने टिपतो. म्हणजे, उडणारा पक्ष्यांचा थवा, रस्त्यावरून धावणारी मोटार, आकाशातील आतषबाजी अशा गोष्टी टिपण्यासाठी तुम्हाला शटरचा वेग वाढवावा लागतो. मात्र त्यासाठी ती वस्तू व्यवस्थित प्रकाशित असायला हवी किंवा त्याभोवती व्यवस्थित प्रकाश असायला हवा. त्याचप्रमाणे कमी प्रकाशित किंवा अंधारात छायाचित्र काढताना शटरस्पीड कमी ठेवल्यास आयएसओची पातळी वाढवूनदेखील छायाचित्र चांगले येते.

सरावातून सराईत व्हा

कॅमेऱ्याच्या ‘प्रो मोड’च्या मदतीने छायाचित्रे काढणे सोपे नाही, मात्र ती अधिक परिणामकारक काढता येतात, हे नक्की. त्यासाठी त्यातील सेटिंगची सांगड घालावी लागते शिवाय तुमच्याकडे छायाचित्रकाराची दृष्टी असणेही आवश्यक आहे. यातही मदत करण्यासाठी अ‍ॅण्ड्रॉइडवर अ‍ॅडॉब लाइटरूम, कॅमेरा एफव्ही-५ हे अ‍ॅप उपलब्ध आहेत. या अ‍ॅपद्वारे तुम्ही या सेटिंगचा अधिकाधिक वापर सहजपणे करू शकता. मात्र त्यासाठी सराव आवश्यक आहेच. एकदा तुम्हाला या सर्व घटकांची माहिती नीट झाली की कोणत्या छायाचित्रणासाठी कोणती सेटिंग करता येईल, हे तुम्ही आपोआप ठरवू शकता.

‘व्हाइट बॅलन्स’

कॅमेऱ्यातून टिपल्या जाणाऱ्या छायाचित्रातील रंगांचा उजळपणा ठरवण्याचे काम ‘व्हाइट बॅलन्स’ या घटकामार्फत होत असते. आताच्या काळात येणाऱ्या स्मार्टफोन कॅमेऱ्यांमध्ये दृश्यानुसार उजळपणा स्वयंचलितपणे निश्चित होत असतो. मात्र तुम्ही छायाचित्रामध्ये विशिष्ट परिणाम साधण्यासाठी ‘व्हाइट बॅलन्स’ कमी जास्त करू शकता.

‘फोकस’

प्रत्येक कॅमेऱ्यात ‘सब्जेक्ट’ अर्थात ज्याचे छायाचित्र घ्यायचे आहे ती वस्तू वा घटक यांवर फोकस निश्चित करता येतो. अलीकडच्या कॅमेऱ्यांमध्ये मॅक्रो म्हणजे जवळचे आणि पोट्रेट म्हणजे व्यापक छायाचित्र काढण्यासाठी तुम्ही फोकस ठरवू शकता. पण एखाद्या झाडावरच्या फुलाचे किंवा त्या फुलावर बसलेल्या फुलपाखराचे अगदी स्पष्ट छायाचित्र काढायचे असल्यास ‘प्रो’मोडमधील फोकस सेटिंग बदलून तुम्ही ते टिपू शकता.

आयएसओ :

‘आयएसओ’ची पातळी कॅमेऱ्याच्या सेन्सरद्वारे छायाचित्रातील प्रकाशाचा स्तर ठरवते. ती जेव्हा ‘ऑटो’वर असते तेव्हा त्यातील सेन्सरसमोरील दृश्यातील प्रकाशस्तर ओळखून छायाचित्रासाठी आवश्यक इतका प्रकाश करते. मात्र तुम्ही स्वत:देखील ती प्रकाशाची पातळी निश्चित करू शकता. रात्री किंवा कमी प्रकाशित जागेवर छायाचित्रण करताना ‘आयएसओ’ची पातळी वाढवता येते. त्याचप्रमाणे भरदुपारी किंवा भरपूर प्रकाश असलेल्या ठिकाणी ती कमी करता येते. यामागचे कारण म्हणजे असे केल्याने त्या ठिकाणच्या छायाचित्रणातील प्रकाशाचा स्तर परिणामकारक राहील, असा ठेवता येतो. अर्थात आयएसओ पातळी वाढवून टिपली जाणारी छायाचित्रे धूसर किंवा ठिपकेयुक्त येतात. त्यामुळे जर तुम्हाला कमी प्रकाशित ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी ‘आयएसओ’ पातळी वाढवावी लागत असेल तर, त्याआधी तुम्हाला ‘शटरस्पीड’ कमी करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:31 am

Web Title: smartphone selfie camera photography dual camera ssh 93
Next Stories
1 घरबसल्या वाहन खरेदी; नोंदणीही ऑनलाइन
2 बाजारात नवीन काय?
3 रोजगाराची नवी संधी… Instagram Reels च्या माध्यमातून करता येणार कमाई
Just Now!
X