स्मार्टफोन ही सध्या प्रत्येकासाठी गरजेची वस्तू झाली असून, त्यावर सतत अपडेट राहण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मात्र त्याचा एक फायदा असला तरी त्यामुळे लक्ष साधण्यात अडचणी येणे, वर्तणूक, स्वयंनियमनामध्ये समस्या येण्यासह मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचा धोका एका नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आला आहे

अमेरिकेतील डय़ूक विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यासाठी नियमित डिजिटल तंत्रज्ञान अर्थात स्मार्टफोन वापरणाऱ्या १५१ किशोरवयीन मुलांचे सर्वेक्षण करून त्यांचा अभ्यास करण्यात आला.

सहभागी झालेल्या मुलांचे दिवसांतून तीन वेळा सर्वेक्षण केले. त्यानंतर १८ महिन्यांनी आढळणाऱ्या लक्षणांचे मूल्यमापन करण्यात आले. सहभागी झालेल्या मुलांमध्ये ११ ते १५ वर्षे वयाच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता. त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती बेताची होती. ही मुले दिवसातील सरासरी २.३० तास स्मार्टफोनवर व्यस्त होती. ते तासन्तास एकमेकांना संदेश पाठवत असत. सहभागी मुले दिवसातून ४१ संदेश पाठवत होते.

ज्या दिवशी ते अधिक वेळ स्मार्टफोनवर घालवत त्या वेळी त्यांच्या स्वभावात बदल होऊन ते अधिक भांडखोर, लक्षात न राहणे यासह वर्तणुकीशी संबंधित इतर अनेक लक्षणे संशोधकांना अभ्यासात आढळून आली. तरुणांमध्ये स्मार्टफोन अधिक वापरल्याने ते जास्त वेळ ऑनलाइन राहात. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वयंनियमन करण्यासह मानसिक समस्या १८ महिन्यांत आढळून आल्या.  आपली मुले स्मार्टफोनचा किती वापर करतात, ते समाजमाध्यमांवर किती वेळ घालवतात याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

हे संशोधन ‘चाइल्ड डेव्हलपमेंट’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.