स्मार्टफोन, वायफाय राऊटर्स आणि मायक्रोवेव्ह यामधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा गरोदरपणामध्ये संपर्क आल्यास गर्भपात होण्याचा धोका निर्माण होत असल्याचा इशारा नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आला आहे.
ज्या वेळी आपण विद्युत उपकरणे वापरतो त्या वेळी विद्युत चुंबकीय लहरींच्या माध्यमातून आयनीकरण नसलेले किरणोत्सर्ग निर्माण होतात. हे किरणोत्सर्ग अनेक विद्युत उपकरणे, पॉवर लाइन, ट्रान्सफॉर्मर, वायरलेस डिव्हाइस आणि वायरलेस नेटवर्क यांच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात तयार होतात. नागरिक ज्या वेळी या उपकरणांचा वापर करतात त्या वेळी त्यांचा विद्युत चुंबकीय लहरींशी संबंध येतो.
किरणोत्सर्ग झाल्यामुळे आजारपण, कर्करोग आणि आनुवंशिक नुकसान मोठय़ा प्रमाणात होते. मात्र गैरआयनीकरणामुळे मर्यादित आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. मागील काही अभ्यासांमध्ये गैरआयनीकरणाचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याचे अचूक निदान केले असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
संशोधकांनी नव्या अभ्यासात १८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना गर्भधारणेदरम्यान चुंबकीय क्षेत्राचा परिणाम अभ्यासणारे एक उपकरण २४ तासांसाठी लावण्यात आले. त्यानंतर या महिलांनी दिवसभरात केलेल्या कामकाजाचे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर ९१३ गरोदर महिलांवर चुंबकीय क्षेत्राचा काय परिणाम होतो, हे तपासण्यात आले.
या अभ्यासात २४.४ टक्के महिलांवर चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होऊन त्यांचा गर्भपात झाल्याचे दिसून आले. गर्भपात होण्याचे हे प्रमाण तीन पटीने अधिक होते. गर्भपाताचा दर हा सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत १० ते १५ टक्के असल्याचे संशोधक ली यांनी म्हटले आहे. मानवी आरोग्यावर स्मार्टफोनमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गाचा परिणाम होतो हे या अभ्यासातून सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2017 1:06 am