25 March 2019

News Flash

पुरुषांपेक्षा महिलांना तंबाखूचा धोका अधिक

आकडेवारी धक्कादायक

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणाऱ्या महिलांची संख्या वाढत असताना त्यांच्यात तंबाखू सेवन करण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसते. निरीक्षणानुसार, तंबाखू सेवन करणा-या महिलांच्या सरासरीत भारत अमेरिकेच्या मागोमाग असून, भारतातील १.२१ कोटी महिला धुम्रपान करत असल्याचे आढळून आले आहे. म्हणजेच भारतातील सरासरी पुरुष दिवसातून ६.१ सिगारेट ओढत असताना एक स्त्री सरासरी ७ वेळा धुम्रपान करते. यातील आश्चर्याची बाब म्हणजे ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात तंबाखू खाण्याचे प्रमाण जास्त आहे. शेतीसारख्या शारीरिक श्रम असलेल्या कामात तसेच घर कामामध्ये  उत्साह येण्यासाठी ग्रामीण स्त्रिया दंत, पेस्ट व मशेरी पावडरसारख्या पदार्थांनी दात घासतात. तसेच बिडी, हुक्का यांसारखे तंबाखूचे स्त्रोत असलेल्या पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाणही जास्त आहे.

धुम्रपानामध्ये दोन प्रकारचे धूर निर्माण होतात. सिगारेटच्या ज्वलनापासून जो धूर येतो तो आणि तर धुम्रपानकर्त्याकडून हवेत पसरणारा धूर. दुस-या व्यक्तींमार्फत होणा-या माध्यमिक धूम्रपानाचा थेट परिणाम व्यक्तींच्या ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर होतो. ज्यामुळे धुम्रपान करणाऱ्या लोकांबरोबर राहणा-या व्यक्तींना हृदय विकाराचा २५ टक्के धोका अधिक असतो. दुस-यांकडून करण्यात आलेल्या माध्यमिक धूम्रपानाचा धोका गरोदरपणाच्या काळात स्त्रियांमध्ये अधिक वाढतो. कारण या माध्यमिक धुम्रपानामुळे नवजात अर्भकांच्या वाढीस समस्या निर्माण होते, धुम्रपान विषयक समस्येवर झालेल्या रोग संशोधन अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे कि, प्रत्यक्ष आणि माध्यमिक धूम्रपानाच्या अतिरेकामुळे गरोदर स्त्रियांचे मिसकॅरेज होण्याचा धोका वाढला आहे. तसेच बाळ जन्माला आल्यानंतरही ते तत्काळ दगावण्याची शक्यता असते.

गरोदरकाळात तसेच डिलिव्हरीनंतर महिलेने ३ ते ४ वेळा धुम्रपान केले असेल, तर तिचे बाळ सडन इंफंट डेथ सिंड्रोम (एसआयडीएस) म्हणजेच जन्मानंतर तत्काळ दगावू शकते. याचा अर्थ असा होतो कि, महिलांमध्ये तंबाखूचे सेवनाचे वाढते प्रमाण हे शिशुमृत्यू दराचे थेट कारण आहे. तसेच धूम्रपान हे महिलांचे अंडाशय आणि पुरुषांच्या शुक्राणूवर थेट परिणाम करतो. त्यामुळे प्रजननक्षमता कमी होऊन वंध्यत्व निर्माण होते. त्याचप्रमाणे प्रीमेच्युअर डिलिव्हरी आणि गर्भात अभ्रकाची वाढ न होणे अशा समस्या देखील उद्भवतात. आजच्या वाढत्या लोकसंख्येची खरी निकड लक्षात घेता, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि वृद्ध स्त्रियांच्या आरोग्यासाठी तंबाखू वापरावर नियंत्रण ठेवणे काळाची गरज बनले आहे.

महिलांमध्ये तंबाखूच्या वापरासंबंधित काढलेले निष्कर्ष खालीलप्रमाणे –

* २०.३ टक्के तरुण महिला तंबाखूच्या उत्पादनांचा वापर करतात ९.० टक्के पेक्षा जास्त स्त्रिया धुम्रपानरहित तंबाखू वापरतात (हे वापरकर्ते पुनरुत्पादक वयोगटातील आहेत)

* तंबाखूच्या वापराचे द्योतक वय  १७.८ वर्षे असताना भारतातील २५.८ टक्के स्त्रियांनी त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षीच तंबाखूचे सेवन करण्यास सुरुवात केली होती.

* तंबाखूच्या या विवीध स्वरूपामध्ये तंबाखू जाळून खाणे, चघळणे आणि धुराच्या वाटे शोषून घेणे हे तीन प्रकार अधिक चालतात.

* बहुतेक भारतीय तंबाखू चावणे आणि सिगारेटद्वारे ओढून घेतात. तसेच मशेरी पावडर बनवून ती तोंडात घालणे, त्याचा रस करणे असे अनेक प्रकार भारतात उपलब्ध आहेत.

* भारतात मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या या तंबाखू स्त्रोतांमध्ये गुटखा, मशेरी आणि मावा इ. पदार्थ प्रमुख आहेत.

 

डॉ. दूरु शाह,

स्त्रीरोगतज्ज्ञ

First Published on March 14, 2018 4:03 pm

Web Title: smoking is not good for health specifically for women avoid smoking