अगदी लहान वयात धूम्रपान करणारी मुले नंतर ड्रग्जच्या आहारी जात असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे.

कॅनडातील डी मॉन्ट्रियल विद्यापीठातील संशोधकांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या धोक्याची माहिती करून देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. लहानपणी सुरू केलेल्या धूम्रपानाचा पुढे किती मोठा धोका निर्माण होतो याची माहिती मुलांना देण्याची गरज असल्याचेही संशोधक सांगतात. सध्या अनेक देशांत उघडपणे व्यसन केले जाते आणि समाजानेही त्याला मान्यता दिली आहे. मात्र त्याचा परिणाम घातक आहे, असेही संशोधकांनी सांगितले.१५ ते १७ या वयादरम्यान धूम्रपान सुरू केलेल्या मुलांमध्ये ड्रग्जकडे वळण्याचे प्रमाण ४४ टक्के इतके आहे.

१५ पेक्षाही कमी वयात धूम्रपान सुरू करणाऱ्यांमध्ये हे प्रमाण ६८ टक्के आहे. हे संशोधन कॅनेडियन जनरल ऑफ सायकेट्री या मासिकात प्रसिद्ध झाले आहे. या संदर्भात संशोधकांनी १०३० मुलांचा अभ्यास केला. १३ ते १७ वयोगटातील मुले गेल्या काही वर्षांपासून गांज्याच्या आहारी केल्याचे समजले. तर २० ते २८ वयोगटातील मुले गांजा, ड्रग्ज, कोकेन, हेरॉइन यांच्या आहारी गेल्याचीही धक्कादायक माहिती संशोधकांना मिळाली. आता या मुलांनी कधीपासून व्यसन सुरू केले याचा शोध संशोधकांनी घेण्यास सुरुवात केली. तर ही सर्व मुले अगदी लहानपणापासूनच व्यसनांच्या आहारी गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ही मुले ड्रग्जपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले.