धूम्रपान करणाऱ्यांपेक्षाही लठ्ठ असलेल्या लोकांना कर्करोग होण्याची जोखीम अधिक असते, असे कर्करोगविषयक एका संशोधनात दिसून आले आहे. ‘ब्रिटिश चॅरिटी’च्या सहभागातून हे संशोधन झाले आहे. लठ्ठपणा हा १३ प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत ठरतो, असे या संशोधनात म्हटले आहे. जठराच्या कर्करोगाचे उदाहरण घेतले असता, इंग्लंडमध्ये अतिरिक्त वजनामुळे हा रोग झालेल्यांची संख्या ही धूम्रपानामुळे हा रोग झालेल्यांच्या संख्येपेक्षा १,९०० ने जास्त आहे, असे ‘ब्रिटिश चॅरिटी’तर्फे सांगण्यात आले.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाबाबतही हीच बाब लागू होते. इंग्लंडमध्ये लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग झालेल्यांची संख्या ही धूम्रपानामुळे हा रोग झालेल्यांच्या संख्येपेक्षा १,४०० ने जास्त आहे. त्याचप्रमाणे यकृताचा कर्करोग झालेल्यांमध्ये त्याला धूम्रपानापेक्षा लठ्ठपणा कारणीभूत असलेल्यांची संख्या १८० ने जास्त आढळली.

याबाबत ‘कॅन्सर रिसर्च, युके’च्या मुख्याधिकारी मिशेल मिट्चेल यांनी सांगितले की, धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊन लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले असताना त्याचा देशभरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आम्ही स्पष्टपणे पाहात आहोत. आरोग्याच्या या प्रश्नावर सरकार धोरणात्मक उपाययोजना जाहीर करते आणि कधी कधी या प्रश्नांकडे डोळेझाकही करते. त्या त्या गोष्टीचे परिणाम  दिसून येत असतात, असे त्या म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, ‘‘आमची मुले ही धूम्रपानमुक्त पिढी ठरू शकते, पण मुलांमधील लठ्ठपणाच्या घातक परिणामांनी आता कळस गाठला आहे. हे दुष्परिणाम थांबविण्यासाठी आता सरकारनेच तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.’’