रात्री एकदा का झोपलं की मग शरीराच्या हालचालींवर आणि इतर गोष्टींवर आपले नियंत्रण राहत नाही. मग, पहाटे उठल्यावर आपल्या शेजारी झोपलेली व्यक्ती झोपेत लाथा मारल्याची किंवा घोरत असल्याची तक्रार केल्यावर आपल्याला कळते. रात्री झोपेत होणा-या गोष्टींवर तर नियंत्रण राहत नाही, हे तर ठीक आहे. पण, रात्री झोपेत घोरण्यामुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो, असा शोध एका परीक्षणातून समोर आला आहे.
अमेरिकेतील विसकॉसिल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या संशोधनाच्या अहवालातून काही बाबी समोर आल्या आहेत. घोरण्यामुळे निद्रानाश, कर्करोग यांसारख्या आजारांची शक्यता वाढते. घोरणा-या आणि श्वसनाच्या विकार असणा-या व्यक्तिंची कर्करोगाने दगावण्याची शक्यता इतरांपेक्षा पाचपटीने जास्त असते.
या परिक्षणासाठी झोपेची समस्या असणा-या १५२२  लोकांचे गेल्या २२ वर्षांपासूनचे तपशील पाहण्यात आला. त्यामध्ये असे आढळले की, झोपेची समस्या कमी प्रमाणात असणा-या व्यक्तींना कर्करोगाचा धोका ०.१पटीनेच वाढला होता. पण, ज्यांना झोपेची समस्या जास्त प्रमाणात असणा-यांना कर्करोगाचा धोका ४.८ पटीने वाढला होता.
त्यामुळे जर तुम्हाला घोरण्याचा त्रास असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ते उपचार घ्या.