17 February 2019

News Flash

Social Media Day, BLOG : टीव्ही, सिनेमाऐवजी आता वेब सीरिजचा ट्रेंड

मनोरंजनाचे माध्यम बदलले आणि संकल्पनाही!

मनोरंजनाचे माध्यम काय असा प्रश्न साधारण १५ वर्षांपूर्वी विचारला गेला असता तर टीव्ही, सिनेमा, रेडिओ, एमपी-3 प्लेअर अशी अनेक उत्तरे पटापट समोर आली असती. पण या सगळ्याची जागा आता एका गोष्टीने घेतलीये. तुम्ही अगदी माझ्या मनातले ओळखलेत.. स्मार्ट फोनने. साडेपाच-सहा इंचाचा स्मार्ट फोन हा अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन गरजांसोबतची ही चौथी महत्त्वाची गरज झालीये. त्यात अत्यंत स्वस्त दरांचे इंटरनेट प्लान आल्याने मनोरंजनाचे प्रमुख माध्यम म्हणून स्मार्ट फोनकडे पाहिले जाते. याच स्मार्टफोनवर तुम्ही आता वेब सीरिजही आरामात पाहू शकता. वेब सीरिजचा ट्रेंड बऱ्यापैकी रूळला आहे.

गेल्या साधारण चार ते पाच वर्षांपासून येणाऱ्या वेब सीरिज चांगल्याच गाजल्या आहेत. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर अनेक अॅप्सद्वारे नेटकऱ्यांना, स्मार्ट फोन युजर्सना वेब सीरिज पाहण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मी आणि माझा फोन संपले, त्यात हरवले की बाहेरच्या जगाशी संबंध संपतोच जणू काही. आभासी जगही खरे वाटू लागते. स्मार्ट फोनची मागणी वाढली तशा मनोरंजनाच्या व्याख्याही बदलल्या. पूर्वी १३ भागांची मालिका असे, त्यानंतर डेलिसोपचा ट्रेंड आला. सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचीही क्रेझ प्रचंड होती. सिंगल स्क्रीन्सला मल्टिप्लेक्सने चांगला पर्याय दिला. मात्र तिथला सिनेमाही आपल्या मोबाईलमध्ये येऊन पोहचला.

अँड्रॉईडवर विविध प्रकारचे अॅप फ्री असल्याने ते डाऊनलोड करून त्यावर वेबसीरिज पाहण्याचा ट्रेंड हळूहळू रूजला. २०१२-२०१३ पासून वेब सीरिजचा ट्रेंड सुरु झाला. अॅमेझॉन प्राईम, आल्ट बालाजी, व्हुट, यू ट्युब ही आणि अशी असंख्य अॅप्स आहेत ज्यावर वेब सीरिजचा धडाका सुरु आहे.

यू ट्युबवर रिलिज झालेला AIB अर्थात All India Bakchod हा शो चांगलाच गाजला. हा शो जेव्हा समोर आला तेव्हा खूपच तमाशा झाला होता. साधारण दीड तासाच्या या शोमध्ये बॉलिवूड अॅक्टर रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यासह करण जोहरने येऊन Roast comedy हा प्रकार समोर आणला. या कार्यक्रमात प्रचंड शिव्या होत्या. अशा शिव्या ज्या बॉलिवूड अॅक्टर्सकडून स्टेजवर अपेक्षित नव्हत्या. मात्र त्या दिल्या गेल्या अनेकांनी हा शो एंजॉयही केला. यानंतर विविध प्रकारच्या आणि विविध विषय घेऊन आलेल्या वेब सीरिज चांगल्याच गाजल्या.

 

सध्याच्या घडीला लस्ट स्टोरीज नावाची एक वेब सीरिज नेटफ्लिक्सवर धुमाकूळ घालते आहे. मनिषा कोईराला, संजय कपूर, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, विकी कौशल, राधिका आपटे, आकाश ठोसर अशी तगडी स्टार कास्ट असलेली ही वेब सीरिज आहे. बाईच्या मनातील सूप्त लैंगिक इच्छा, त्या पूर्ण करण्यासाठीची त्यांची धडपड या सगळ्याचे चित्रण या वेब सीरिजमध्ये करण्यात आले आहे. अनुराग कश्यप, झोया अख्तर, करण जोहर, दिबाकर बॅनर्जी अशा चार दिग्गज दिग्दर्शकांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे.

आयपीएल क्रिकेट त्यावरची सट्टेबाजी, मनोरंजन, सेलिब्रिटी या सगळ्यासंदर्भात अॅमेझॉन प्राईमवर INSIDE AGE ही सीरिजही चांगलीच गाजली. १० भागांचा पहिला सिझन चांगलाच गाजला. विवेक ओबेरॉय, रिचा चढ्ढा, अंगद बेदी, संजय सुरी अशा अनेकांच्या भूमिका यामध्ये होत्या. अभिनेता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे या सीरिजचे कार्यकारी निर्माते होते. क्रिकेट आणि बॉलिवूडचे नाते, सेक्स, सट्टेबाजी असे सगळेच विषय यात हाताळले होते.

देव डीडी, लेडिज रुम या देखील सीरिज चांगल्याच गाजल्या. लेडिज रूम ही दोन मुलींची कथा होती. यामध्ये अत्यंत बोल्ड कंटेट होता. द गुड गर्ल शो, द आम आदमी फॅमिली, पिचर्स, पर्मनंट रुममेट्स, ट्रिपलिंग, मॅन्स वर्ल्ड, बँग -बाजा- बारात, आलिशा, लाईफ सही है अशा किती तरी वेब सीरिजची नावे घेता येतील. या वेब सीरिजमधून वैविध्यपूर्ण विषय हाताळले गेले. मग ते विषय स्त्री, कुमार वयातील मुले-मुली, आत्ताची लाईफस्टाईल, लग्न व्यवस्था, ऑफिसमधील समस्या, नाते-संबंध,  सिनेमा, प्रेमभंग, प्रेम-प्रकरण हे आणि असे अनेक विषय यातून हाताळण्यात आले. विविध प्रकारचे हे प्रयोग लोकांना आवडलेही त्याचमुळे गेल्या काळात मनोरंजनाची परिभाषाही बदलली. वेब सीरिज लोकांना सिरीयल्स आणि सिनेमापेक्षा जास्त जवळच्या वाटू लागतील असा काळ यायचा आहे, पण त्याचे वेबसीरिजला सध्या तरी अच्छे दिन आले आहेत हे नाकारता येणार नाही. त्याचमुळे माधवन, विवेक ओबेरॉय, फरहान अख्तर, नेहा धुपिया, भूमी पेडणेकर हे आणि यांच्यासारखे अनेक कलाकार या सीरीजकडे वळले.

एके काळी इंटरनेट, स्मार्ट फोनवरचे इंटरनेट हे सगळ्यांची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. मात्र स्मार्ट फोन जसा प्रत्येकाच्या हाती आला, तसे विविध प्रयोग होऊ लागले. लाखो अॅप्स आणि त्यावर सुरु असणाऱ्या या सीरिजना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे, यापुढेही तो मिळत राहिल असे आत्ता तरी वाटते आहे. कदाचित येत्या काळात आणखी नव्या संकल्पना येतील आणि रुजतीलही. सध्या तरी ट्रेंड आहे तो वेब सीरिजचाच!  ब्रीद ही आर. माधवनची सीरिजही चांगलीच गाजली. एक काळ असा होता की सोशल मीडिया, वेबसाईट, स्मार्ट फोन ही मनोरंजनाची माध्यमे होतील असे वाटलेही नव्हते. मात्र गेल्या १५ वर्षात काळ प्रचंड बदलला. त्यानंतर मग मागणी तसा पुरवठा या नियमाने वेब सीरिजला डिमांड आली. टीव्ही, सिनेमाला पर्याय म्हणून या वेब सीरिज दिमाखात वावरत आहेत. काहीतरी नवी संकल्पना रूजेपर्यंत तरी या सीरिजला मरण नाही हे नक्की!

समीर जावळे
sameer.jawale@indianexpress.com

 

 

First Published on June 30, 2018 6:59 am

Web Title: social media day marathi blog on web series