Social Media Day : भारत हा अतिशय उत्साही आणि क्रीडाप्रेमी लोकांचा देश आहे. भारतात विविध क्रीडाप्रकार खेळले जातात. पण या सर्व खेळांपैकी क्रिकेट हा खेळ भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. गल्लीतल्या पोरा-टोरांपासून ते अगदी वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांना ५ क्रिकेटपटूंची नावे विचारली, तर कोणीही सहज सांगेल. सोशल मीडियासारख्या तरूणाईच्या माध्यमातही हेच दिसून येते. आज Social Media Day च्या निमित्ताने आपण ‘ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले TOP ५ भारतीय क्रीडापटू पाहत आहोत. या यादीतही क्रिकेटपटूंने वर्चस्व राखले आहे.

१. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्या या यादीत अव्वल स्थान राखून आहे. विराटाचे सध्या ट्विटरवर २५.७ मिलियन म्हणजेच अंदाजे २ कोटी ५६ लाख ८८ हजार ६९९ फॉलोअर्स आहेत. विराट हा खेळासाठी जितका सक्रिय असतो, तितकाच तो सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय असतो.

२. सचिन तेंडुलकर – भारतीय क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही सचिन हा कायम चर्चेचा विषय असतो. त्यामुळे सचिनचे सध्या २६.६ मिलियन म्हणजेच २ कोटी ६६ लाख २० हजार ०२१ फॉलोअर्स आहेत. सचिन हा सोशल मीडियावर सक्रिय असतोच, पण त्याबरोबरच सामाजिक कार्यांमुळे तो कायम चर्चेत असतो.

३. वीरेंद्र सेहवाग – भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग हा कायम ‘हटके’ शैलीत ट्विट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या अनेक ट्विट्सला प्रचंड प्रतिसादही मिळाला आहे. सध्या सेहवागचे १ कोटी ७५ लाख ८६ हजार ३८७ फॉलोअर्स आहेत.

४. सुरेश रैना – भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज सुरेश रैना हा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या रैनाचे १ कोटी ४७ लाख ८३ हजार ०१३ फॉलोअर्स आहेत. रैनाच्या लग्नानंतर त्याच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली असल्याचे दिसून आले आहे. कारण, लग्न, विविध दौरे, दैनंदिन जीवनातील काही महत्वाचे क्षण आणि जोडीदार व आपल्या कन्येचे फोटो यामुळे रैना कायमच ट्विटरवर सक्रिय असल्याचे दिसते.

५. सानिया मिर्झा – भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा ही या यादीतील एकमेव महिला क्रिडापटू आहे. सानियाचे सध्या ८४ लाख १८ हजार ६७४ फॉलोअर्स आहेत. या यादीत स्थान मिळवणारी क्रिकेटतर क्रीडापटूंपैकीही सानिया एकमेव क्रीडापटू ठरली आहे. सानिया ही तिच्या खेळासाठी चर्चेत असते. तसेच, पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्याशी विवाहबद्ध झाल्यामुळे सानियाच्या फॉलोअर्सच्या यादीत पाकिस्तानी क्रीडाप्रेमींचाही समावेश आहे.

(ही आकडेवारी शुक्रवार संध्याकाळ पर्यंतची आहे.)