सोशल मीडिया आणि त्याचे होणारे हॅकिंग याबाबत मागच्या काही दिवसांत जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसते. सध्या आपल्यातील सर्वच वयोगटातील लोक सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारखी माध्यमे वापरत असताना काळजी घेणे आवश्यक असते. सोशल मीडियावरील लॉग इन डिटेल्स आणि इतर गोष्टींच्या चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. लॉग इन डिटेल्सचा वापर करून कंपन्या आपला डेटा हॅक करतात. या डेटाचा उपयोग कंपन्या आपल्या फायद्यासाठी करतात. त्यामुळे आपल्या माहितीचा गैरवापर होऊ नये म्हणून सोशल मीडियाचा वापर करताना विशेष काळजी घ्यायला हवी. याबाबत पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरोचे चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितलेल्या काही गोष्टी

* आपण मोबाईलमध्ये अनेक सोशल मीडिया अ‍ॅप वापरतो. कंपनी स्वतःच्या लाभासाठी आपली माहिती एकत्रित करतात आणि त्याची विक्रीही केली जाते. अ‍ॅप डाऊनलोड करताना आपण सर्व अटींना मान्यता देतो जे आपल्या लक्षातही येत नाही. अशावेळी आपली वैयक्तिक माहिती लिक होते. त्यामुळे सोशल मीडिया अ‍ॅप आपल्या दैनंदिन वापराच्या मोबाईलवर वापरू नये.

* गुगलही आणि गुगल जीपीएस आपल्या सर्व माहितीची टेहळणी करुन त्याची माहिती विक्री केली जाते.

* कोणत्याही कंपनीचे मेल सुरक्षित नाहीत, मोफत वापराच्या सर्व इमेल सेवा देणाऱ्या कंपन्या आपल्या सर्व माहितीची टेहळणी करीत असतात.

* सरकारची सामान्य नागरिकांसाठी इमेल सेवा उपलब्ध होत नाही तोपर्यंत मोफत वापराच्या सर्व इमेल सेवा देणाऱ्या कंपन्या डेटा चोरी करीतच राहणार आहेत. कारण आपणच अ‍ॅप डाऊनलोड करताना त्याच्या सर्व अटींना मान्यता देत असतो.

* सोशल मीडिया अ‍ॅपसारख्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून माहिती एकत्रित करून विश्लेषित माहितीचा उपयोग करतात, सर्वच राजकीय पक्ष अशाप्रकारे आपले काम साध्य करतात.

* सोशल मीडियावरील विविध अ‍ॅपवरुन मुलभूत हक्कांची माहिती शेअर होते. अशाप्रकारे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने भारताने चीनसारखी स्वत:ची इंटरनेट प्रणालीची भूमिका व धोरण स्विकारले पाहिजे.

ही काळजी घ्यायला हवी

१. सोशल मीडिया वापरत असताना त्यावरील दुसरे अनधिकृत अ‍ॅप वापरू नये. उदा. फेसबुकवर मल्लू अ‍ॅप सारखे अ‍ॅप्लिकेशन.

२. आपले बँक खाते, पैसे, दागिन्यांविषयी कसल्याही प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळावे.

३. नवरा-बायको अथवा इतर नातेसंबंधातील वाद कधीही सोशल मीडियावर शेअर करू नका.

४. सोशल मीडियावर आपले किंवा इतरांचे नग्न फोटो शेअर करू नका.

५. मित्र, नातेवाइकांचा अथवा इतर कोणाचाही अपमान झाला असेल, तर त्याविषयीचे फोटो, व्हिडीओ शेअर करणे टाळावे.

६. मद्यपान/धूम्रपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकू नका.

७. आपल्याकडून आक्षेपार्ह पोस्ट शेअर होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी..

सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करत असताना संबंधितांची परवानगी घेऊन अशा स्वरुपाची माहिती संकलित करून विश्लेषित करण्याचे अधिकार माहिती तंत्रज्ञान कायद्याने दिले आहेत. इंटरनेट ही अमेरिकेची संकल्पना व निर्मिती आहे. त्यामुळे सर्व कंट्रोल अमेरिकन कंपन्याचा असून जगभर हे जाळे पद्धतशीरपणे पसरविले आहे. याला केवळ चीन अपवाद आहे. चीनने स्वत:ची सरकारी इंटरनेट सुविधा निर्माण केली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सर्व माहिती आपल्या कवेत आली आहे त्याप्रमाणेच जगभरातील माहिती अमेरिका रोज आपल्या कवेत घेत आहे. त्यामुळे या सगळ्या बाबतीत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.