सोशल नेटवर्किंग साईट्सवरील छायाचित्रांमुळे कुमारवयीन मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम होत असल्याचे यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपल्या मित्रांचे धूम्रपान किंवा मद्यपान करतानाचे छायाचित्र बघितल्यामुळे कुमारवयीन मुलांनाही ते कृत्य करावेसे वाटत असल्याचे संशोधनात आढळून आले.
अमेरिकेतील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील थॉमस व्हॅलेंटे यांच्या नेतृत्त्वाखाली हे संशोधन करण्यात आले. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील मजकुराचा कुमारवयीन मुलांच्या वर्तणुकीवर काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. व्हॅलेंटे आणि त्यांच्या सहकाऱयांनी एकूण १५६३ कुमारवयीन मुलांच्या वर्तणुकीचा अभ्यास केला. ही सर्व मुले लॉस एंजेलिस येथील एल मॉंट युनियन हायस्कूलमधील असून ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०११ या काळात या सर्वांच्या वर्तणुकीवर सोशल नेटवर्किंग साईट्सचा काय प्रभाव पडला, याचा अभ्यास केला गेला. संबंधित मुले दिवसातून कितीवेळ सोशल नेटवर्किंग साईट्स वापरतात. त्यांना मद्यपान किंवा धूम्रपानाच्या सवयी आहेत का, आधीपासून सवय असेल तर त्यामध्ये काय बदल झाले, याचीही नोंद संशोधनावेळी ठेवण्यात आली.
सोशल नेटवर्किंग साईट्सवरील छायाचित्रांचा कुमारवयीन मुलांवर मोठा प्रभाव पडत असल्याचे संशोधनात आढळले. या साईट्सवर आपल्या मित्रांची मद्यपान किंवा धूम्रपान करतानाची छायाचित्रे बघणाऱयांना ती कृती करावीशी वाटत असल्याचेही आढळले. जी कुमारवयीन मुले मद्यपान करीत नाहीत, त्यांच्यावर या छायाचित्रांचा मोठा परिणाम होत असल्याचे संशोधकांना आढळले.