केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोशल साईटसवरून अर्थमंत्र्यांच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या. काही नेटीझन्सनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काही जणांनी याबद्दल नापसंती दर्शविली. जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘अत्यंत महत्वपूर्ण’ पाऊल असल्याचे सांगत तंबाखूजन्य उत्पादनांच्या किंमतीत ११ ते ७२ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता.  यापूर्वी पाकिटांवर धोक्याची सूचना देणारे संदेश छापूनसुद्धा सिगारेटचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत विशेष फरक पडला नव्हता. त्यामुळे या उत्पादनांचे सेवन रोखण्यासाठी किंमतींमध्ये वाढ करणे हा एकमात्र उपाय असल्याची प्रतिक्रिया दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या आरव भट याने दिली. त्यामुळे आता सिगारेटप्रेमींना आपली तल्लफ भागविण्याबरोबरच सिगरेटसवरील खर्च आटोक्यात ठेवण्याची दुहेरी कसरत करावी लागणार आहे. सरकारने सिगारेटसच्या किंमतीमध्ये केलेली वाढ एकतर्फी असून या निर्णयामुळे सिगारेटचे सेवन करणाऱ्यांच्या संख्येत फरक पडणार नसून, ते फक्त स्वस्त ब्रॅण्डकडे आपला मोर्चा वळवतील, अशाप्रकारच्या प्रतिक्रियादेखील सोशल साईटसवर पहायला मिळत होत्या.