पचनसंस्था किंवा आतडय़ातील जीवाणू हे कंपवाताचा (पार्किन्सन) विकार रोखू शकतात, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. कंपवातामध्ये जी प्रथिने मेंदूत साठतात त्यांचे निराकरण त्यातून होते. गोलकृमींचे कंपवात प्रारूप पाहिले असता त्यात पूर्वी पोटातील जीवाणूंचा संबंध कंपवाताशी जोडण्यात आला होता. चांगले जीवाणू म्हणजे सुजैविके ही मेंदूला डोपामाइन मिळण्यापासून रोखणाऱ्या विषारी गाठी दूर करण्यास मदत करतात. त्या गाठींची उपासमार करून त्यांना मारण्याचे काम हे आतडय़ातील जीवाणू करतात.

कंपवात होऊ नये यासाठी डोपॅमाइन हे रसायन मेंदूपर्यंत पोहोचणे गरजेचे असते, पण काही विषारी गाठींमुळे ते पोहोचत नाही. सेल रिपोर्ट्स या नियतकालिकात म्हटले आहे, की सुजैविकांच्या मदतीने डोपामाइनची मेंदूतील निर्मिती सुरळीत करता येते. त्यातून नवी औषधे तयार करता येतील.

कंपवात असलेल्या लोकांच्या मेंदूत अल्फा सायन्युक्लिन या प्रथिनाच्या चुकीच्या घडय़ा तयार होतात व त्यांचे थर साठून मेंदूत विषारी गाठी बनतात. या गाठींमुळे ज्या चेतापेशी डोपॅमाइन तयार करतात त्याच मरतात. या पेशी मेल्याने शरीराच्या हालचालींवरचे नियंत्रण कमी होते व हात पाय थरथरतात. एडिंगबर्ग व डंडी विद्यापीठाच्या संशोधकांनी गोलकृमींच्या वापरातून हे संशोधन केले आहे. त्यात असे दिसून आले, की कृमींना सुजैविके दिली असता विषारी गाठी कमी झालेल्या दिसल्या. बॅसिलस सबटिलिस या जीवाणूने प्रथिनांच्या चुकीच्या घडय़ा कमी होऊन गाठीही कमी होतात. त्यातून त्यांच्या हालचाली सुधारल्या.

अल्फा सायन्युक्लिनच्या विषारी गाठी नव्याने तयार होण्याची प्रक्रिया या जीवाणूंमुळे रोखली जाते. पेशीतील काही मेदांवरची प्रक्रिया करण्याची वितंचकांची पद्धत हे जीवाणू बदलतात, त्यामुळे या विषारी गाठी होत नाहीत. स्फिंगोलिपीडस नावाच्या मेदावरची प्रक्रिया या जीवाणूंमुळे बदलली जाते. मारिया डॉइटसिडॉ यांनी सांगितले,की पोटात चांगले जीवाणू असतील तर कंपवातावर मात करता येऊ शकेल.