मेंदूची क्रियाशीलता वाढवून स्मृती सुधारण्यासाठी वैज्ञानिकांनी औषधे व रसायने न वापरता वेगळे साधन शोधून काढले आहे. त्यातून स्किझोफ्रेनियासह इतर आजारांवर नवीन उपचार विकसित करणे शक्य होणार आहे. जीएफई ३ हे प्रथिन यात महत्त्वाचे ठरले असून त्यामुळे मेंदूतील जोडण्यांचा नकाशा तयार करणे शक्य होणार आहे. मेंदूतील काही जोडण्या स्मृतीच्या संदर्भात कसे काम करतात हे त्यामुळे लक्षात येईल, असे सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉन बी अर्नोल्ड यांनी सांगितले. या संशोधनातून मेंदूचे कार्य नियंत्रित करणे शक्य होणार असून त्यामुळे स्किझोफ्रेनियापासून कोकेनच्या व्यसनापर्यंत अनेक विकारांवर या संशोधनाचा उपयोग होणार आहे. मेंदूविषयी नवीन उपचाराचा आधार जीएफई ३ हे प्रथिन असून त्याच्याआधारे मेंदूतील आतापर्यंत अगदी अपरिचित राहिलेल्या प्रथिनांचे गुणधर्म कळतात. प्रथिननिर्मिती व त्यांचा नाश याची गुंतागुंतीची प्रक्रिया त्यामुळे कळत असते. मेंदूतील अनेक प्रथिने ही केवळ दोन दिवस टिकतात व नंतर त्यांची जागा वेगळी प्रथिने घेत असतात. जीएफई ३ हे प्रथिन मेंदूतील प्रथिनांच्या जोडण्या व त्यांचा ऱ्हास यात भूमिका पार पाडू शकते. या प्रथिनामुळे मेंदूतील प्रथिनांची निर्मिती व त्यांचे नष्ट होणे या प्रक्रियेची सूत्रे कुठलीही औषधे न देता आपल्या हातात येऊ शकतात, असे अर्नोल्ड यांचे म्हणणे आहे. उंदीर व झेब्राफिस यांच्यात जीएफई प्रथिनाचे कार्य समजावून घेण्यात वैज्ञानिकांना यश आले असून. जीएफई ३ प्रथिन हे पाठीच्या कण्याच्या दोन्ही टोकांना असलेल्या एकमेकांविरोधी काम करणाऱ्या न्यूरॉन्सना उद्दीपित करीत असते. त्यामुळे माणसाच्या हालचालीत समन्वय राहत नाही. आतापर्यंत नैराश्य, निद्रानाश व इतर रोगांत बेन्झोडायझ्ॉपाइनसारखी औषधे दिली जात आहेत. ती यापुढे लागणारच नाहीत. या औषधांचा तोटा असा आहे की, ज्या न्यूरॉन्सला लक्ष्य बनवले आहे, त्याव्यतिरिक्त इतरही न्यूरॉन्सचे काम बंद पाडू शकतात. परस्परविरोधी काम करणारे न्यूरॉन्स हे एकेमकांच्या पुढे-मागे असू शकतात. त्यामुळे या औषधांचे दुष्परिणाम आहेत. जीएफई ३ प्रथिनाच्या गुणधर्मामुळे हव्या त्याच न्यूरॉन जोडणीवर उपचार शक्य आहे. त्यामुळे इतर न्यूरॉन्सचे कार्य बिघडणार नाही. नेचर मेथड्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.