विसराळूपणाचा आजार जर प्राथमिक पातळीवरचा असेल तर अमिनोग्लायकोसाइड्स प्रकारातील प्रतिजैविकातून (अँटिबायोटिक्स) त्यावर मात करता येऊ शकते असे दिसून आले आहे. विसराळूपणाच्या विकाराची सुरुवात असेल तरच ही औषधे उपयुक्त परिणाम करतात. स्मृती कमी होण्याच्या या आजारात यामुळे नवीन उपचारांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या आहेत.

ह्य़ूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधात म्हटले आहे की, फ्रंटटेम्पोरल डिमेन्शिया हा एक सर्वसाधारण आजार असून तो वयाच्या ४० ते ६५ वयोगटात सुरू होतो व त्यामुळे मेंदूच्या कुंभखंड व अग्रखंड या भागांवर परिणाम होतो. या आजारात विसराळूपणा वाढून बोलणे, लिहिणे यावर विपरीत परिणाम होतो, असे अमेरिकेतील केंटुकी विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. या आजारातील काही रुग्णात असे जनुकीय उत्परिवर्तन असते ज्यामुळे मेंदूच्या पेशी प्रोग्रॅन्युलिन हे प्रथिन तयार करण्यापासून वंचित राहतात. या प्रथिनाच्या अभावी फ्रंटटेम्पोरल डिमेन्शिया विकार होतो. यात अमिनोग्लायकोसाईड प्रकारातील प्रतिजैविके ही उपयोगी पडतात.

ती हे घातक उत्परिवर्तन थांबवतात त्यामुळे प्रोग्रॅन्युलिन हे प्रथिन तयार होते. या प्रतिजैविकांचे रेणू पेशींची रचना अशा पद्धतीने बदलतात की ज्यामुळे हे प्रथिन पुन्हा निर्माण होण्यास मदत होते, असा दावा मॅथ्यू जेंट्री यांनी केला आहे. जेंटॅमायसिन व जी ४१८ ही प्रतिजैविके ही समस्या दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे या प्रथिनाची निर्मिती ५० ते ६० टक्के पातळी गाठते. याचे प्रयोग उंदरात यशस्वी झाले असून त्यामुळे चांगले परिणाम दिसून आले. या संशोधनातून प्राथमिक पातळीवरच्या विसराळूपणावर उपचार करण्यासाठी नवीन औषध तयार करता येईल असे संशोधक हेनिंग झू यांचे मत आहे.