भटकंती करणं हा बऱ्याच जणांचा छंद असतो. यात काही जण असेही असतात ज्यांना ग्रुपसोबत न जाता एकट्यानेच सोलो ट्रीप करायला आवडते. विशेष म्हणजे या सोलो ट्रीपची आवड केवळ मुलांनाच असते असं नाही. तर अनेक मुली, स्त्रियांनाही सोलो ट्रीप करायला आवडते. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये महिलांसोबत घडलेल्या घटनांवर एक नजर टाकली तर स्त्री असुरक्षित असल्याची जाणीव होते. त्यामुळे बऱ्याच वेळा मुलींना, स्त्रियांना सोलो ट्रीपला पाठविण्यासाठी घरातले मनाई करतात. परंतु भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जेथे महिला सोलो ट्रीपला जाऊ शकतात तेदेखील अगदी सुरक्षितरित्या. चला तर मग पाहुयात भारतात महिला करु शकतील अशी सोलो ट्रीपची ठिकाणं.-

१. ऋषिकेश –
उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश हे महिलांच्या सोलो ट्रीपसाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेलं हे गाव एक पवित्र तीर्थक्षेत्र असून ऋषिकेशला निसर्गाचा वारसा लाभला आहे. येथे मोठमोठ्या पर्वतरांगा, खळखळत वाहणारी गंगा नदी येथील आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. तसंच लक्ष्मण झुला,त्रिवेणी घाट, स्वर्ग आश्रम, रामझूला, परमार्थ निकेतन घाट, नीलकंठ महादेव मंदिर, भरत मंदिर, कैलाश निकेतन मंदिर, वशिष्ठ गुफा, गीता भवन, मोहनचट्टी ही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. ऋषिकेशला रेल्वेमार्ग, हवाईमार्ग आणि रस्तेमार्गाने जाता येऊ शकतं.

 

२. हम्पी –
हम्पी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हम्पी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हम्पी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी महिला सोलो ट्रीप करु शकतात.

३. झिरो व्हॅली –
अरुणाचल प्रदेश म्हटलं की डोळ्यासमोर झिरो व्हॅली येते. अनेक जण या व्हॅलीला स्वर्गदेखील म्हणतात. महिलांसाठी सोलो ट्रीप करण्यसाठी ही अत्यंत सुंदर जागा आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा ब्रेक हवा असेल तर येथे नक्कीच भेट द्यायला हवी.

४. जयपूर –
पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध असलेलं जयपूर पर्यटनाच्या दृष्टीने फार सुंदर ठिकाण आहे. येथे हवा महल, जल महल, नाहरगढचा किल्ला, आमेरचा किल्ला, जंतर-मंतर, सिटी पॅलेस, गल्ताजी, बिरला मंदिर, गढ गणेश मंदिर, जयगढचा किल्ला, या ठिकाणांना पर्यटनासाठी पहिली पसंती दिली जाते.

वाचा : तिबेटमध्ये होते काळ्या सफरचंदाची शेती; एका सफरचंदाची किंमत ऐकाल तर व्हाल चकित

५. पदुच्चेरी –
येथे सोलो ट्रीपसाठी आलेल्या महिला अॅडव्हेंचर स्पोर्टसचा आनंद घेऊ शकतात. येथे फिरण्यासाठी सुंदर ठिकाणं आणि खाण्याचे एकाहून एक सरस पदार्थ मिळतात. त्यामुळे ज्या महिला खवैय्या आहेत आणि ज्यांना अॅडव्हेंचर अनुभव घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी नक्कीच भेट द्या.