झोपताना हे केल्यास चांगले, झोपताना तसे केले तर शांत झोप लागते, ही गोष्ट केल्यास वाईट स्वप्नं पडत नाहीत असे सल्ले आपण अनेकदा ऐकतो. झोप ही आपल्या जीवनशैलीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ठराविक तास घेतलेली झोप उत्तम आरोग्यासाठी गरजेची असते. सध्याच्या स्पर्धेमुळे आधीच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मात्र जितकी मिळते तितकी झोप शांत झाल्यास पुढचा दिवस तर चांगला जातोच पण आपला मूडही चांगला राहण्यास मदत होते. याशिवाय चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. योग्य तो आहार, व्यायाम याबरोबरच चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी झोपण्याआधी काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. आपली झोप चांगली झाली तर चेहराही नकळत चांगला दिसतो. काय आहेत या गोष्टी, जाणून घेऊया…
१. खोलीचे तापमान जास्त गरम किंवा थंड नसावे

-आपण झोपत असलेल्या खोलीचे तापमान सामान्य असणे गरजेचे असते. हे तापमान खूप जास्त किंवा कमी असल्यास त्याचा थेट चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होतो. एकदम कमी किंवा जास्त तापमान असल्यास त्वचा कोरडी पडते आणि ती निर्जीव दिसू लागते. त्यामुळे हे तापमान सामान्य आहे की नाही हे तपासून मगच झोपावे.

२. झोपण्याआधी अल्कोहोल घेणे

– झोपण्याआधी अल्कोहोल घेतल्याने झोपेवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. अल्कोहोल घेऊन झोपल्यास सकाळी उठल्यावर चेहरा निर्जीव आणि निराश दिसतो. याशिवाय झोपताना अल्कोहोल घेतल्यास शरीर लवकर डिहायड्रेट होते. यामध्ये चेहऱ्यातील पेशींना पुरेसे पाणी न मिळाल्याने चेहरा बेजान दिसतो.

३. झोपण्याआधी सोशल मीडियावर अॅक्टीव असणे

-सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक जण जेवण, इतर कामे झाल्यानंतर झोपताना व्हॉटसअॅप किंवा फेसबुकसारख्या सोशल साईटसवर अॅक्टीव असतात. मात्र मोबाईल किंवा टॅबलेटचा प्रकाश चेहऱ्यासाठी हानिकारक असतो. अशामुळे झोप लागण्यासही विलंब होतो. चांगल्या त्वचेसाठी योग्य प्रमाणात झोप होणे आवश्यक असते. मात्र सोशल मीडियाच्या वापराने झोपेमध्ये व्यत्यय येतो आणि चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसते.

४. चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेऊन झोपणे

-चेहऱ्यावर मेकअप किंवा इतर प्रदूषित गोष्टी असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. यामुळे चेहरा कोरडा पडू शकतो. तसेच मेकअपच्या उत्पादनांमुळे काही वेळा चेहऱ्याची आग होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे झोपताना मेकअप काढून मगच झोपावे. यामुळे सकाळी उठल्यावर चेहरा फ्रेश दिसतो.