अनेकदा एखाद्या ठिकाणी अडकून पडलेलो असताना ऐनवेळी मोबाइल नेटवर्क न मिळाल्याने अनेकांची गोची होती. मात्र यापुढे मोबाइल नेटवर्क नसलं तरी तुम्हाला लँडलाइन तसंच मोबाइल फोनवर कॉल करणं शक्य होणार आहे. केंद्र सरकार लवकरच प्रस्ताव स्विकारत देशभरात इंटरनेट टेलिफोनीला मान्यता देणार आहे. यामुळे मोबाइलला नेटवर्क नसलं तरी चिंता करण्याची गरज नाही.

टेलिकॉम ऑपरेटर्स तसंच ज्यांच्याकडे टेलिफोनी लायसन्स आहे अशा कंपन्या तुम्हा नव्या मोबाइल क्रमांकासाठी ऑफर करु शकतात. विशेष म्हणजे या मोबाइल क्रमांकासाठी तुम्हाला कोणतंही सिमकार्ड घेण्याची गरज लागणार नाही. इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करत तुम्ही तुमचा क्रमांक अॅक्टिव्हेट करु शकता. TRAI च्या नियामक मंडळाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. नेहमी कॉल ड्रॉपच्या समस्येला सामोरं जावं लागणाऱ्या ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी एक नवा पर्याय मिळावा यादृष्टीने TRAI कडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

दूरसंचार आयोगाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. यामुळे एअरटेल, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि इतर ऑपरेटर्स इंटरनेट टेलिफोनी सर्व्हिस सुरु करु शकतात. TRAI चे सल्लागार अरविंद कुमार यांनी सांगितल्यानुसार, ‘ग्राहकांना यामुळे कनेक्टिव्हिटीसाठी नवे पर्याय मिळणार असून, त्याचा फायदा होईल’. ‘यामुळे ग्राहकांना अजून एक पर्याय उपलब्ध होईल, खासकरुन ज्या ठिकाणी नेटवर्कची प्रचंड समस्या आहे. याचा फायदा त्या इमारती आणि घऱांनाही होईल जिथे नेटवर्क मिळताना खूप समस्या होते, मात्र वाय-फाय नेटवर्क चांगलं आहे’, असं अरविंद कुमार यांनी सांगितलं आहे.

काय आहे इंटरनेट टेलिफोनी सर्व्हिस आणि ते वापरायचं कसं ?
इंटरनेट टेलिफोनीचा वापर करायचा असेल तर ग्राहकाला ऑपरेटरने ऑफर केलेलं अॅप डाऊनलोड करावं लागेल. यानंतर ग्राहकाला १० आकडी क्रमांक मिळेल. हा क्रमांक मोबाइल क्रमांकाप्रमाणेच असेल. उदाहरणार्थ जर तुम्ही आत्ता एअरटेलचं सिमकार्ड वापरत असाल आणि इंटरनेट टेलिफोनीसाठी रिलायन्स जिओ हवं असेल तर तुम्हाला जिओ इंटरनेट टेलिफोनी अॅप डाऊनलोड करावं लागेल. यासाठी तुम्हाला नवीन मोबाइल क्रमांक मिळेल. याच क्रमांकावरुन तुम्ही ब्रॉडबॅण्डचा वापर करत कॉल करु शकणार.

पण जर तुम्ही आत्ता ज्या कंपनीचं सिमकार्ड वापरत आहात त्याच कंपनीचं अॅप डाऊनलोड केलं तर तुम्हाला आहे त्याच क्रमांकावर ही सुविधा मिळू शकते.