बंगळुरू येथील संस्थेचे संशोधन

आपल्या मेंदूतील तळाशी आढळणाऱ्या चेतापेशी सतत एका तालासुरात विद्युत संदेश पाठवत असतात असे बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बॉयॉलॉजिकल सायन्सेस या संस्थेतील वैज्ञानिकांनी प्रयोगातून सिद्ध केले आहे. मेंदूच्या मागील भागाला अनुमस्तिष्क म्हणजे सेरेबेलम असे म्हणतात व तेथील चेतापेशींकडून विद्युत संदेश पाठवले जातात. एक प्रकारे या संदेशातून चेतापेशींचे संगीतच आपल्याला अनुभवायला मिळते. काही विशिष्ट परिस्थितीत या दोन प्रकारच्या संदेश लहरीतील एक पकडला जातो, तो पकडायचा की नाही हे मेंदूतील पेशीच्या भित्तिकांदरम्यान जे विभवांतर असेल त्यावरून ठरते.

मोहिनी सेनगुप्ता व वत्सला थिरूमलाई या नॅशनल सेंटर फॉर बॉयॉलॉजिकल सायन्सेसच्या महिला वैज्ञानिकांनी मेंदूतील चेतापेशीतून निघणाऱ्या संदेशात अगदी संगीतासारखी लय असते हे दाखवून दिले आहे. सेरेबेलम म्हणजे अनुमस्तिष्क हा मेंदूतील लहान पानासारखा भाग असतो व तो तोल सांभाळणे, समन्वय साधणे व नवीन कौशल्ये आकलन करणे यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. सायकल चालवणे, पियानो वाजवणे यांसारखी कौशल्ये आपण त्यामुळेच साध्य करीत असतो. अनुमस्तिष्कातील परकीनजी नावाच्या पेशी एका थरात रचून ठेवलेल्या असतात ती ही कामे करीत असतात. परकीनजी पेशी ताल सिद्धान्त हा वैज्ञानिकांनी प्रयोगानिशी सिद्ध केला असून या पेशींना मेंदूच्या वेगवेगळ्या भागांतून संदेश मिळत असतात व नंतर अनुमस्तिष्कातील या पेशी आणखी खोलवर असलेल्या थरांकडे संदेश पाठवत असतात. परकीनजी पेशी या एक प्रकारचे न्यूरॉन्स असतात व त्यांचा शोध चेकोस्लोव्हाकियाचे शरीरशास्त्रज्ञ जॅन इव्हॅनजेलिस्टा परकाइन यांनी लावला होता. परकीनजी पेशी इतर चेतापेशींशी कशा संपर्कात असतात हे आतापर्यंत गूढ होते. कारण प्राणी जेव्हा जागे व चालत-फिरत असता तेव्हा हे संदेश टिपता येत नाहीत. अतिशय संवेदनशील यंत्रणेने त्यांचे विद्युत संदेश टिपले जातात. त्यासाठी प्राण्यांना भूल देऊन संदेश टिपले जातात, थोडी हालचाल झाली तरी संदेश टिपणारी यंत्रणा हलल्याने उद्देश साध्य होत नाही. पण भूल दिल्याने मेंदूतील संदेश बदलू शकतात ही या प्रयोगाची मर्यादा आहे. परकीनजी पेशींची स्तब्ध स्थिती किंवा उत्तेजित स्थिती असते त्यानुसार नेमके उलटे म्हणजे अनुक्रमे स्फोटक व स्तब्ध संदेश इतर पेशींना पाठवले जातात. उत्तेजित म्हणजे अप स्टेटमध्ये मेंदूच्या इतर भागांकडून आलेले संदेश ग्रहण केले जात नाही. विशिष्ट संदेशच ग्रहण केले जातात त्यामुळे आपण एखादी गोष्ट शिकत असताना त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

झेब्राफिशवर प्रयोग
गंगा व ब्रह्मपुत्रेच्या पाण्यात सापडणाऱ्या झेब्राफिशवर हा प्रयोग करण्यात आला. झेब्राफिश हा पारदर्शक असतो व त्यात कवटीची वाढही झालेली नव्हती अशा अवस्थेत हा प्रयोग केला. त्याच्यातील चेतापेशींमध्ये एक डीएनए सोडून ती प्रकाशित केली गेली. नंतर परकीनजी पेशी जिथे आहेत तिथे संवेदक बसवण्यात आला. मेंदूवर परिणाम करणार नाही अशा हालचाली बंद करणारा घटक त्यात सोडण्यात आला. त्यामुळे अगदी भूल न दिलेल्या प्राण्यातील विद्युत संदेश असतात तेच टिपता आले असे म्हणायला हरकत नाही.