अवयवदानाचे महत्त्व पटावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध मोहिमा राबविण्यात आल्या असल्या तरी अद्यापही अवयवदात्यांच्या संख्येत वाढ झालेली नाही. आता ‘मोअर टू गिव्ह’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली असून २०२० पर्यंत प्रत्येक २० लाख लोकसंख्येपैकी एक व्यक्ती अवयवदाता असेल, असे या मोहिमेचे लक्ष्य आहे. कारगिल दिवसाचे औचित्य साधून अभिनेता इरफान खान याच्या हस्ते गेल्या आठवडय़ात या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

पाच वर्षांपूर्वी अवयवदानाचा दर १० लाखा लोकांमागे ०.०५ असा होता. तो आता ०.५ होईल, असे फोर्टिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भवदीप सिंग यांनी सांगितले. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून त्यासाठीच ही मोहीम राबवण्यात आल्याचे ते म्हणाले.

मृत्यूनंतर आपले अवयव दान करता येतात. हे अवयव गरजवंतांना उपयुक्त ठरू शकतात, याची जाणीव खूप कमी लोकांना असते. याबाबतची जागरूकता वाढली पाहिजे, असे मत एआयआयएमएस या अवयव पेढीच्या अध्यक्षा आरती वीज यांनी सांगितले,  तर फोर्टिस रुग्णालयाचे  कार्यकारी अध्यक्ष मालविंदर मोहन सिंग यांनी सांगितले की, अवयवदान आणि अवयवांची वाहतूक यासंदर्भात पायाभूत सुविधा कमी पडत आहेत, त्या वाढविण्याची गरज आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)