बदलत्या जीवनशैलीचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. अनेकदा आपण बाहेर मिळणारे चमचमीत, तेलकट, मसालेदार पदार्थ खातो. पण त्यामुळे आपल्या आरोग्यावरा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच बाहेर मिळणारे हे पदार्थ थोड्या हटके पद्धतीने घरीच तयार केले तर? सध्या दिवाळीचा माहोल आहे, त्यामुळे सतत घरातील गोडाधोडाचं खाऊन प्रत्येक जण कंटाळतो. त्यामुळे घरीच जर बाहेर मिळणाऱ्या पदार्थांप्रमाणे एखादी रेसिपी ट्राय केली तर घरातील प्रत्येक सदस्य खुश होऊन जाईल. त्यामुळेच पौष्टिक पॅनकेक कसे करायचे हे पाहुयात. जाणून घेऊयात बीन्स ऑन राइस फ्लोअर पॅनकेकची रेसिपी.

साहित्य –
तांदळाचे पीठ- २ कप
उकडलेला राजमा- १ कप
टोमॅटो- १ कप
लाल तसेच पिवळ्या रंगाची सिमला मिरची- १ कप
कांदापात- अर्धा कप
३-४ लसूण पाकळ्या
हिरव्या मिरच्या- २
ताजी कोथिंबीर
चवीपुरते मीठ

कोथिंबीर, टोमॅटो तुमच्या गरजेनुसार त्या त्या आकारात कापून घ्या. लाल तसेच पिवळ्या रंगाची सिमला मिरची तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.
कृती –

तांदळाचे पीठ आणि पाणी एकत्र करून भजीच्या पिठासारखे दाट पीठ तयार करून घ्या. त्यात मिरच्या तसेच कोथिंबीर टाका. मीठ घाला आणि बाजूला ठेवून द्या. राजमा मिक्सरमधून बारीक करून घ्या.

आता एका भांडय़ात तेल गरम करून घ्या. त्यात कांदापात, लसूण, सिमला मिरची घाला आणि चांगले परतून घ्या. त्यात बारीक केलेला राजमा घाला. टोमॅटो घाला आणि १० मिनिटे शिजवा. त्यानंतर हे मिश्रण थंड करायला ठेवून द्या.

आता गॅसवर नॉन स्टिक पॅन ठेवून तो गरम झाल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ घालून पातळ, वरील फोटोत दिल्याप्रमाणे लहान लहान धिरडे बनवा. ते दोन्ही बाजूंनी चांगले झाल्यावर तव्यावरून बाजूला काढा. अशी ४-५ धिरडी झाल्यावर त्यात राजमाचे मिश्रण घाला. आधी चिरून ठेवलेल्या सिमला मिरची, कांदा पात या भाज्या एका बोलमध्ये मिसळून त्या डिशमध्ये ठेवलेल्या बीन्स पॅनकेकवर घालून सजवा आणि खायला द्या.
शेफ नीलेश लिमये