कर्करोग म्हटले की अजूनही सर्वानाच घाम फुटतो, पण काही रुग्णांत तो बराही होतो पण त्याच्या कथा पुढे येत नाहीत. मुलांना कर्करोग असेल तर त्यांना जर वेळीच उपचार दिले, योग्य काळजी घेतली तर कर्करोग बरा होण्याची शक्यता जास्त असते.
आता कर्करुग्ण मुलांसाठी खास अन्नपदार्थावर एक खानपान पुस्तिका ‘फिएस्टा कुक बुक’ या नावाने राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड रीसर्च सेंटरने प्रकाशित केली आहे. त्यात या पदार्थाच्या पाककृतीही (रेसिपीज) दिल्या आहेत.
‘फिएस्टा कुक बुक’ हे कर्करोगग्रस्त मुलांच्या आईवडिलांना नक्कीच उपयोगी आहे. चांगल्या पोषक आहाराने कुठल्याही रोगाचा सामान करणे सोपे जाते, त्याच संकल्पनेतून हे पुस्तक भारतातील दोन खानसामे (शेफ) सार्थक भारद्वाज व आदित्य जेमिनी यांनी लिहिली आहे. ते भारतातल्या पहिल्या २० नावाजलेल्या खानसाम्यांपैकी आहेत. हे पुस्तक खूप परिश्रम करून तयार केले आहे व अनेकांना उपयोगी आहे, असे मत डॉ. गौरी कपूर यांनी व्यक्त केले. त्या बाल रक्त व कर्करोगशास्त्र विभागाच्या संचालक आहेत. कपूर यांच्या मते कर्करोग व त्यावरील उपचारांमुळे मुलांच्या अन्नसहनशक्तीवर परिणाम होतो. काही प्रकारचे अन्न त्यांना सोसत नाही, त्यामुळे योग्य अन्नपदार्थाचा वापर महत्त्वाचा असतो.
अन्न सुरक्षितता, पोषणमूल्ये व अन्न सेवनासाठी देण्याची पद्धत यावर कर्करोग उपचारांचे यश अवलंबून असते. मुलांच्या पोषण गरजांची नेमकी समज पालकांना यातून मिळेल व कर्करोगग्रस्त मुलांना त्याचा फायदा होईल.
लहान मुलांना होणारे ७०-९० टक्के कर्करोग बरे होतात, पण त्यासाठी योग्य उपचार व आहार याला महत्त्व आहे त्या दृष्टीने हे पुस्तक महत्त्वाचे आहे. सार्थक यांच्या मते त्यांना मुलांसाठी पाककृतींची आवड आहे, त्यामुळे या पुस्तकाच्या रूपाने त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. आई-वडिलांनीही यातील पाककृती वापरून बघायला हरकत नाही. त्या मुलांना आवडतील व त्यांना जीवदानही देतील.भारतात ४० ते ५० हजार मुलांना दरवर्षी कर्करोग होतो, असा अंदाज आहे.