‘ये जवानी हे दिवानी’मध्ये डोळ्याला चष्मा, हातात पुस्तकांचा ढीग घेऊन उभ्या असलेल्या दीपिकाला पाहताच क्षणी रणबीर तिला ‘चष्मिश’ म्हणतो. एरवी कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने मुलीला असं म्हटलं असतं तर, तिने त्याची गचांडी धरली असती. पण रणबीरच्या ‘चष्मिश’ बोलण्यामध्येही मुलींनी ‘रोमान्टिसिझम’ शोधला..

एरवी ‘फॅशनिस्टा’ म्हणून मिरवणारी सोनम तिच्या इन्टाग्राम फोटोजमध्ये मोठय़ा फ्रेमचा चष्मा घालून बसलेली दिसते. सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, रणबीर कपूर, हृतिक रोशन, जॉन अब्राहम अशा कित्येक बॉलीवूड सेलिब्रिटिज मोठमोठय़ा इव्हेंट्समध्ये चष्मा चढवून वावरताना दिसतात. अर्थात यातील बऱ्याच जणांना नंबरचा चष्मा लागला आहे. मात्र, एकूणच चष्मा ही जगात अधिक आत्मविश्वासाने आणि ‘स्टायलिश’पणे वावरण्यासाठीचे साधन बनले आहे.

‘एरवी चष्मा लावावा लागेल’, असं डॉक्टरने निदान केल्याबरोबर ‘लेन्स लावल्या तर चालतील का,’ हा प्रश्न सहज विचारला जायचा. चष्म्यामुळे चेहऱ्यावर येणारा बावळटपणा टाळण्यासाठी ‘लेन्स’चा ट्रेण्ड सुरू झाला. ते इतकं वाढलं की, नंबरसोबत वेगवेगळय़ा रंगांच्या लेन्सही बाजारात येऊ लागल्या. पण चष्मा डोळय़ांवर चढवल्यानंतर चेहऱ्यावर येणारा सीरियस आणि इन्टेन्स लुक आता तरुणाईला हवाहवासा वाटू लागला आहे. डोळ्यांवर चष्मा आणि हातात एखादं (आयुष्यात कधीही एक पानही न पालटलेलं) पुस्तक घेऊन कॅम्पसमध्ये फिरलं तरी मुलींमध्ये ‘स्कॉलर’टाइप म्हणून मिरवता येतं, असंही मानलं जाऊ लागलं आहे. नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी वावरताना चष्म्यामुळे चेहऱ्यावर येणारा ‘मॅच्युअर लुक’ वरिष्ठांमध्ये तुमच्याबद्दल विश्वास वाढवण्यास मदत करतो, हे अनेकदा आढळून आलं आहे. यासाठी डोळय़ांना नंबर हवा, याचीही गरज नाही. उलट संगणकावर काम करण्यासाठी किंवा तीव्र प्रकाश असलेल्या ठिकाणी डोळय़ांचे संरक्षण करण्यासाठी चष्मा वापरला जात आहे.

चष्म्यांचे महत्त्व अशा प्रकारे वाढल्याने त्यात प्रचंड वैविध्य आलं आहे. मात्र, आपल्या चेहऱ्यासाठी चांगला चष्मा निवडताना नीट पारख करणं अत्यावश्यक आहे. अतिफॅन्सी किंवा कॅट आय फ्रेम असलेले चष्मे घेणं, टाळलं पाहिजे. असे चष्मे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवण्यापेक्षा त्यांना बेढब बनवू शकतात. नंबरचा चष्मा वापरताना काचेची खास काळजी घेतली जाते त्यामुळे खोटय़ा चष्म्याचीही तशीच काळजी घेतली पाहिजे. चष्मा हे ‘फॅशन स्टेटमेंट’ बनलं असलं तरी ती फॅशन आपल्या व्यक्तिमत्त्वाला अधिक आकर्षक बनवील का, याचा विचार करूनच केली पाहिजे.

फ्रेम कशी निवडावी..

१.कॉन्ट्रास्ट फ्रेम-आपल्या फ्रेमचा आकार आणि चेहऱ्याच्या आकारात नेहमी विरोधाभास (कॉन्ट्रास्ट) असणे गरजेचे आहे. जर तुमचा चेहरा उभा असल्यास तुम्ही गोलाकार किंवा आयताकृती फ्रेम निवडू शकता, जेणेकरून चेहऱ्यावर फ्रेम उठून दिसेल.

२. प्रमाण – सनग्लास आणि चष्मा निवडताना दोन गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सनग्लासेस्चा आकार मोठा असल्यामुळे उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांचे संरक्षण होते. मात्र हेच प्रमाण चष्मांच्या बाबतीत अत्यंत चुकीचे ठरते. चष्म्याची निवड करताना आपल्या चेहऱ्याच्या आकाराशी साधम्र्य साधणारी फ्रेम निवडावी.

३.रंग- फ्रेमचा रंग निवडताना आपल्या चेहऱ्याच्या रंगाचा विचार करणे गरजेचे आहे. काळ्या रंगाची फ्रेम सर्वाना शोभून दिसते. जर आपल्या चेहऱ्याचा रंग कृष्णवर्णीय असल्यास त्यांना विविध रंगछटांच्या गडद फ्रेम शोभून दिसतात.

४. चेहरा आकार- फ्रेम निवडताना सर्वसाधारणपणे उभा, गोलाकार, चौकोनी चेहरा असा एकंदर विचार आपण करतो. मात्र चेहऱ्याच्या आकाराचा विचार करताना आपल्या कपाळाचा भाग, गालांची बाजू, नाकाचा आकार हेही विचारात घेणे महत्त्वाचे आहे.

पेस्टल शेड्स आणि अ‍ॅनिमल प्रिंट्स

चष्म्याच्या फ्रेममध्ये काळा आणि ब्राऊन रंग अधिक पसंत केला जातोच. पण त्यासोबतच आकाशी, क्रीम, बिस्किट कलर, बेबी पिंक, लाइट ऑरेंज असे पेस्टल शेड्स ट्रेण्डमध्ये आहेत. ‘ओपेक फ्रेम’चे म्हणजेच पारदर्शी फ्रेमचे चष्मेही बाजारात पहायला मिळतात. अ‍ॅनिमल प्रिंटचे चष्मेसुद्धा बाजारात पाहायला मिळतात.

गोल फ्रेम आणि वुडन फ्रेम

चष्म्याच्या फ्रेम्समध्ये गोल आकाराला बरीच मागणी आहे. हे चष्मे बहुतेक सर्व चेहरापट्टीला सूट होतात. आकाराने लहान असल्याने चेहरा झाकलाही जात नाही. यातही वुडन फिनिश असलेल्या फ्रेम्स सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

रेट्रो विरुद्ध स्पोर्टी लुक

चष्म्याच्या लुकमध्ये ५०च्या दशकातला रेट्रो लुक आणि स्पोर्टी लुक ट्रेण्डमध्ये आहेत. रेट्रो स्टाइल चष्म्याला अध्र्या फ्रेम्स असतात. चष्म्याच्या वरच्या बाजूला जाड फ्रेम असते, तर खालच्या बाजूला फ्रेम नसते. स्पोर्टी लुकमध्ये जाड फ्रेमचे, प्रामुख्याने चौकोनी मोठय़ा आकाराच्या फ्रेम्स पाहायला मिळतात. यांचे रंगही बेसिक काळा, ब्राऊन, राखाडी असे असतात.

कुठे मिळतील?

चष्मा केवळ मिरवायला घालायचा असेल तर फॅशन स्ट्रीट, लिंक रोड, हिल रोड, अंधेरी लोखंडवाला मार्केट या मुंबईच्या स्ट्रीट मार्केटमध्ये १००-२०० रुपयांच्या रेंजमध्ये उत्तम चष्म्याच्या फ्रेम मिळतील.