चष्मा ही काहींना सौंदर्य खुलवणारी वस्तू वाटते, तर मुलींच्या बाबतीत चष्मेवाली मुलगी मुलांना नको असते म्हणून मुली डोळ्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रियाही करून घेतात, पण आता डोळ्याला चष्मा लावावाच लागणार नाही असे नवे डिस्प्ले तंत्रज्ञान लवकरच येत आहे.
वैज्ञानिकांनी हे तंत्रज्ञान विकसित केल्याने एखाद्या वस्तूची डोळ्यात पडणारी प्रतिमा अशा पद्धतीने जुळवली जाते, ज्यामुळे तुम्हाला कुठलाही चष्मा न लावता ती वस्तू स्वच्छ दिसते.  यात प्रकाश छानकाच्या मदतीने (लाइट फिल्टर) अलगॉरिथमच्या मदतीने वस्तूची प्रतिमा बदलून ती डिस्प्ले समोर आणली जाते.
अलगॉरिथममुळे प्रत्येक रंगबिंदूपासून येणारा प्रकाश बदलला जातो. तो एका प्लास्टिक छानकाच्या लहानशा छिद्रातून पार होतो. त्यानंतर आपल्या दृष्टिपटलावर पडतो. त्यामुळे अतिशय स्वच्छ प्रतिमा तयार होते, त्यामुळे चष्मा लावण्याची गरज राहत नाही असे ‘एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्य़’ू नियतकालिकात म्हटले आहे.
प्रतिमेच्या दोषाचा विचार
आपल्या डोळ्यात पडणारी प्रतिमा विस्कळीत कशी होते याचा विचार प्रत्यक्ष पडद्याच्या मदतीने करण्यात आला. त्यानंतर त्या वस्तूची प्रतिमा डोळ्यात पडून तुम्हाला दिसण्याच्या आधीच्या टप्प्यातच दुरुस्त केली गेली तर ती वस्तू स्वच्छ दिसते.
बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील ब्रायन ए बारस्के यांच्या मते तुमच्या डोळ्यात प्रकाशशास्त्रावर आधारित चष्म्याने जी प्रतिमा पाडली जाते तशी या तंत्राने पाडतात फक्त त्यात चष्मा नसतो.
वस्तू स्पष्ट दिसण्याचा दावा
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व मायक्रोसॉफ्ट यांनी इंद्रधनुषी रंगाच्या बलूनच्या प्रतिमा बदलल्या. व्हिन्सेंट व्हॅन गॉग या चित्रकाराच्या चित्राची डोळ्यात पडणारी प्रतिमा डोळ्यातील दोषांच्या स्थितीनुसार बदलली, त्यामुळे निकटदृष्टिता व दीर्घदृष्टिता हे दोष असणाऱ्या व्यक्तींना वस्तू स्वच्छ दिसतील अशी व्यवस्था करण्यात आली.
 चष्मे व स्पर्श भिंगांनीही डोळ्याचे जे दोष दूर करता येत नाहीत ते न्यू डिस्प्ले तंत्रज्ञानाने दूर करता येतील त्यात स्फेरिकल अ‍ॅबरेशन म्हणजे भिंगाच्या वेगवेगळ्या भागातून प्रकाशाचे विवर्तन वेगवेगळ्या पद्धतीने होण्याच्या दोषाचाही समावेश आहे.