सध्याचे जीवन हे तणावग्रस्त आहे. तसेच, नैराश्याच्या (डिप्रेशन) आहारी अनेक लोक जातात. हे नैराश्य दूर होण्यासाठी वेगाने चालणे उपयोगाचे ठरते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
स्कॉटलंडमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार वेगाने चालण्याची सवय लावून घेतल्यास नैराश्यातून मुक्तता मिळू शकते. नैराश्य दूर होण्यासाठी व्यायाम हा तर उपयोगी असतोच, हे सर्वांनाच माहित असेल. पण, चालण्यासारख्या सोप्या व सहज व्यायामामुळेही हे साध्य होऊ शकते, हे परिक्षणातून आढळले आहे. दहापैकी एका व्यक्तीला तरी नैराश्याने गाठलेले असते. यावर डॉक्टरांचे औषधोपचार कामी येत नाही. मात्र, चालणे-फिरणे आणि व्यायामामुळे यासाठी तितकाच लाभ होतो.फिरत असताना लक्ष अन्य गोष्टींकडे जात असल्याने मनावरील ताण दूर होण्यासाठी मदत मिळते. तसेच तणावामुळे शरीरात जे हानीकारक घटक जमा होत असतात ते व्यायामामुळे दूर होतात, असे ‘मेंटर हेल्थ अँड फिजिकल अँक्टिविटी’ नियतकालिकामध्ये यासंबंधीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती.