करोना काळात प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपनी SpiceJet ने एक स्पेशल ऑफर आणली आहे. कंपनीच्या ‘Book Befikar सेल’ला सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये देशांतर्गत विमान प्रवासाचं तिकीट ८९९ रुपयांपासून सुरू होतं.

करोना संकटकाळात झालेला तोटा भरुन काढण्यासाठी कंपनीने हा खास सेल आणला आहे. पाच दिवसांच्या या सेलला १३ जानेवारीपासून सुरूवात झाली असून १७ जानेवारीपर्यंत सेल सुरू असेल. सेलमध्ये बूक केलेल्या तिकीटावर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रवास करता येईल. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे या सेलबाबत माहिती दिली आहे. फक्त देशांतर्गत प्रवासासाठीच ही ऑफर आहे. Book Befikar Sale अंतर्गत बूक केलेल्या तिकीटाची तारीख प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलू शकतात किंवा रद्दही करु शकतात. याशिवाय तिकीट बूक केल्यानंतर कंपनीकडून एक मोफत तिकीट व्हाउचरही दिलं जात आहे. हे तिकीट व्हाउचर जास्तीत जास्त १००० रुपयांचं आहे. हे व्हाउचर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वैध असेल. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे व्हाउचर लागू असेल. या व्हाउचरला किमान ५,५०० रुपयांच्या व्यवहारासाठी वापरता येईल.


दरम्यान, ही ऑफर केवळ एकतर्फी प्रवासासाठी लागू असेल, आणि ही ऑफर इतर कोणत्याही ऑफरसोबत जोडता येणार नाही किंवा ग्रुप बुकिंगवरही लागू होणार नाही, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. कंपनीने Book Befikar Sale बाबत आपल्या http://www.SpiceJet.com या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.