सर्वसामान्यत: सध्या प्रत्येक व्यक्ती ही मागील ५० वर्षांच्या तुलनेत कित्येक जादा उष्मांक (कॅलरी) देणारे अन्न सेवन करीत आहे. हे जादा उष्मांक म्हणजे रोज एक अतिरिक्त बर्गर खाण्याइतपत आहेत. अरबट-चरबट अन्नपदार्थ, ज्यांना ‘जंक फूड’ म्हणून ओळखले जाते, खाल्ल्यामुळे मानवाच्या मेंदूचे आरोग्य झपाटय़ाने खालावत चालले आहे, असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

याबाबत झालेले संशोधन ‘फ्रन्टिअर्स इन न्यूरोएन्डोक्रिनोलॉजी’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार, जगातील सुमारे ३० टक्के प्रौढ लोक हे अतिरिक्त वजन असलेले किंवा लठ्ठ आहेत. सन २०३० पर्यंत जगातील एकूण प्रौढ लोकांपैकी १० टक्क्यांहून अधिक व्यक्तींना दुसऱ्या प्रकारच्या (टाइप २) मधुमेहाची लागण झालेली असेल, असे या अभ्यासात म्हटले आहे.

याविषयी ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठातील प्रा. निकोलस चेरबुईन यांनी सांगितले की, मेंदूच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घातक अशा चटपटीत अन्नपदार्थाचे सेवन केले जात आहे. त्याच वेळी व्यायाम- शारीरिक हालचाली अत्यंत कमी किंवा जवळपास शून्य प्रमाणात होत आहेत. ते पुढे म्हणाले की, खानपानाच्या सवयी दीर्घकाळ बिघडल्याने तसेच व्यायामाच्या अभावामुळे अशा व्यक्तींमध्ये दुसऱ्या प्रकारचा मधुमेह जडण्याची मोठी जोखीम असते. या व्यक्तींच्या मेंदूच्या कार्यात मोठय़ा प्रमाणावर बिघाड होऊन मानसिक व्याधी होण्याची, तसेच मेंदू आक्रसून जाण्याची शक्यताही असते. अनारोग्यदायी जीवनशैली आणि मेंदूची हानी होणे, यात सुस्पष्ट संबंध असल्याचे आम्हाला दिसून आले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्यमवयीन व्यक्तींमध्ये ही हानी कधीही भरून न निघणारी असते. त्यामुळे प्रत्येकाने बालपणापासूनच किंवा किमान प्रौढपणाच्या आधीपासून आरोग्यदायी अन्न खावे, शरीर सुडौल ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला.