पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे. पालक केवळ एक भाजीच नाही तर तिचे औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे चला तर मग जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे –

– पालक खाल्याने तुमच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढते

– आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन हे वरदानच आहे.

– पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो. पालक, टोमॅटो, काकडी, कांदा यांचे सॅलड किंवा कोशिंबीर बनवून त्यात थोडेसे लिंबू पिळावे. लिंबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे पालक भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया होते. म्हणून सहसा पालक हा स्वच्छ धुऊन कच्च्या स्वरूपात खावा.

– पालकामध्ये विपुल प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.

– अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.

– अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.

– पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे. त्यामुळे एखाद्या स्तन्यपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळी बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर पालक पानांचे सूप करून बाळाला पाजावे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.

– पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

– अंगावर गाठ येऊन जर सूज आली असेल तर अशा वेळी पालक पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.

– पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

– आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.

– शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक रस दिवसातून दोन वेळा १-१ कप घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ, थेंब थेंब लघवी होणे अशी लक्षणे नाहीशी होतात.