गणेश बागल
खरं तर सध्याचा मोसम हा काही हिमालयातील भटकंतीचा मोसम नाही, पण मुद्दाम आत्ताच हिमालयातील भटकंतीवर लिहितोय. कारण कुणी जून-ऑगस्टमध्ये हिमालयात भटकायला जायचं नियोजन केलं असेल त्यांना ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. अगदी आतापासून बुकिंग केलं तर त्यांना विमानखर्चातदेखील भरपूर सवलत मिळेल.
हिमालयात गेल्यावर मनात अफाट ही एकच उपमा येते. रोजच्या धकाधकीतून हिमालयात जाणं म्हणजे कुठल्या तरी लांबच्या ग्रहावरच गेल्यासारखं वाटतं. मला तुलना नाही करायची, पण हिमालयात गेल्यावर आपला सह्य़ाद्री सतत आठवत राहतो. हिमालय आपल्या सह्य़ाद्रीसारखा मायाळू आणि देखणा अजिबात नाही. कल्पनेपलीकडं रांगडा आणि भव्य आहे हिमालय. तो मानसिक आणि शारीरिक अशा दोन्हीही पातळ्यांवर परीक्षा घेणारा आहे. असं असूनही हिमालय म्हटलं की लडाख आठवतं. पण बाईक राईड आणि निळं आकाश या पलीकडचा हिमालय अनुभवायचा असेल तर स्पितीशिवाय पर्याय नाही. ऑगस्टमध्ये एकदा मी स्पितीला गेलो होतो, तेव्हाच ठरवलं होतं की तेच ते डोंगर आणि निळं आकाश सोडून काही तरी वेगळं टिपायचं. वाराणसी, पुष्कर आणि वारीमुळे लोकांचे चेहरे तसंच हावभाव टिपायचं कौशल्य मी थोडंफार आत्मसात केलं होतं. म्हणून स्पितीचं लोकजीवन कॅमेऱ्यातून टिपायचं ठरवलं. पण सिमल्यापासून स्पितीला येईपर्यंत वेगळं असं काही मिळालंच नाही, आणि आता काही वेगळं मिळेल असं वाटतदेखील नव्हतं.
स्पितीला असंच फिरत फिरत के मॉनेस्ट्रीला (याला ‘काई मॉनेस्ट्री’ देखील म्हणतात) आलो. एक हजार वर्षे जुना असा हा मठ आणि प्रार्थनास्थळ सर्वानाच आकर्षित करतं. इतकंच नाही तर हिमाचल टुरिझमचं ते वैभव आहे. लाखो पर्यटक इथं येत असतात. फोटोग्राफरला तर इथं मोठीच संधी. मी गेलो त्या दिवशी तिथे खूपच धावपळ सुरू होती कारण पारंपरिक वेशभूषेत नृत्याचा एक कार्यक्रम दोन दिवसांत होणार होता. त्यासाठी तिथल्या तरुण लामांचा सराव सुरू होता. ते तरुण लामा नृत्याचा सराव करत होते, त्या जागेपासून जवळच दोन चिमुकले लामा आपल्याच नादात नाचत होते. नंतर समजलं की ते दोघंही खूपच लहान असल्याने त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतलं नव्हतं. तरीही ते दोघं त्या तरुण लामांचा नृत्याचा सराव पहात, त्या संगीताच्या तालावर स्वत:च नाचत, गात होते. मी फक्त त्यांना कॅमेऱ्यात टिपायचं काम केलं. पण त्या फोटोने मला नवी ओळख मिळवून दिली. आता तर मी स्पितीमध्ये काढलेले इतर फोटो कुणालाच आठवत नाहीत. स्पिती म्हटलं की लोकांना या दोन लामांचेच फोटो आठवतात.
अर्थात स्पिती हा झाला प्रवासातला शेवटचा टप्पा. त्याआधी आपल्याला नाकोला आणि ताबोला जायचंय. एकटय़ाने किंवा कमी पशात ट्रिप करायची असेल तर हिमाचल सरकारच्या बसेसचा पर्याय उत्तम आहे. पण त्यासाठी फक्त गर्दीच्या वेळा आणि प्रवासाला लागणारा वेळ याची सांगड घालून नियोजन करावे लागेल. सिमल्याहून स्पितीसाठी सकाळीच बस आहेत. पण एकदम हा पूर्ण दिवसाचा प्रवास न करता टप्प्याटप्प्याने प्रवास केला तर वेगळ्याच हिमाचल प्रदेशाचं दर्शन होतं आणि हिमाचलला देवभूमी का म्हणतात ते अनुभवता येतं. सिमल्याहून निघाल्यावर पहिला मुक्काम करायचा तो नाको या गावी. हे छोटंसं गाव प्रसिद्ध आहे तिथे असलेल्या छोटय़ा तळ्यासाठी. एवढय़ा उंचावर तळं असणं हीच एकदम वेगळी आणि आश्चर्याची बाब आहे. अतिशय सुंदर आणि टुमदार अशा या गावाची लोकसंख्या जेमतेम ३००-४०० एवढीच असेल. पण तिथे हॉटेल्स चांगली आहेत. त्यामुळे राहण्याची सोय चांगली होते. या गावातल्या लोकांना तसंच लहान मुलांना बघितल्यावर त्यांचे फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. नाको या गावाच्या समोरच एक पर्वतरांग आहे. तिथली जमीन आणि चंद्रावरची जमीन जवळजवळ सारखीच आहे, त्यामुळे याला मूनलॅण्ड नाव मिळालं आहे, असं सांगितलं जातं.
नाको इथं एक दिवस मुक्काम करून पुढे निघालं की तीनचार तासांच्या अंतरावर ताबो हे एक जुनं गाव लागतं. या गावात असलेल्या बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीची स्थापना ९९६ मध्ये झाली आहे. म्हणजेच ही मॉनेस्ट्री जवळजवळ ११०० वर्ष जुनी आहे. ती बघून इथे मुक्काम करता येतो किंवा मग थोडं पुढं लाँगजा इथं जाता येतं. तिथं तथागत बुद्धाची मूर्ती आहे. लाँगजा इथं मुक्काम करून रात्री चांदण्याच्या प्रकाशात ही बुद्धमूर्ती पाहण्याची मजा काही औरच आहे. यानंतर जायचं ते दलाई लामांनी सर्वात पवित्र व सुंदर असा उल्लेख केला आहे ती मॉनेस्ट्री पाहायला. स्पितीची राजधानी काझा शहरापासून जवळ असलेली काई या गावातली ही काई किंवा केअसं नाव असलेली मॉनेस्ट्री. इथेच मला त्या दोन चिमुकल्या लामांचे फोटो मिळाले होते.
इथे एक सकाळ किंवा सायंकाळ घालवायला हरकत नाही. मॉनेस्ट्रीचं वातावरण आणि किलबिल करणारे छोटे भिख्खू बघत अनुभवायला मजा येते.
काझा शहर बरंच मोठं आहे. इथे राहण्यासाठी बरीच हॉटेल्स आहेत आणि मुख्य म्हणजे ती स्वस्त आहेत. इथे मुक्काम करून आजूबाजूच्या छोटय़ा गावांना भेट देता येऊ शकते. जवळच हिक्कीम नावाचं गाव आहे. तिथे जगातील सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस आहे. भारत-चीन सीमेवरचं हे शेवटचं गाव आहे. काझाच्या बाजूने वाहणाऱ्या सतलज नदीच्या किनारी फिरण्याची मौज काही औरच आहे.
कॅमेरा आणि लेन्स
स्पिती हे तसं पाहिलं तर लॅण्डस्केप फोटोग्राफरचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. पण त्यापलीकडे इथे खूप काही आहे. म्हणूनच वाइड अँगलपासून ते काही पोट्रेट लेन्स सोबत ठेवाव्यात. म्हणजेच ५० एमएम किंवा ८५ एमएम लेन्स ठेवाव्यात.
असा कराल प्रवास
स्पितीला सर्वात जवळचं विमानतळ आहे सिमला. सध्या त्याचं काम सुरू असल्यामुळे तिथे फारशी विमानं तेथे येत नाहीत. त्यानंतर जवळचं विमानतळ आहे चंदिगड. तिथून सिमला किंवा मनालीला जाता येतं. सिमला चांगलं कारण मनाली उंचावर असल्याने लगेच हवापालट झाल्याचा त्रास होऊ शकतो. सिमल्यावरून नाको-ताबो-स्पिती करत मनालीला आलात तर त्रास कमी होतो आणि आपणही वातावरणातील बदलाला सरावत जातो.
First Published on June 13, 2018 3:11 pm