25 October 2020

News Flash

चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

चाचा- चाची म्हणजे अनेक पर्यटकांसाठी तिथले सेलिब्रिटीच झाले आहेत. त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांनीही घेतली आहे.

चंद्रा ढाबा, chandra dhaba batal

स्पिती व्हॅलीच्या सफरीवर गेलेल्यांसाठी साधारण, आठ- दहा दिवसांच्या या सफरीमध्ये येणारा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘चंद्रताल’. समुद्रसपाटीपासून, साधारण ४ हजार तीनशे मीटर उंचीवर असणारं हे नयनरम्य ठिकाण. ताल म्हणजेच तलाव. स्पितीच्या खोऱ्याची सफर करत असताना शेवटच्या टप्पायत सहसा या चंद्रतालला भेट दिली जाते. ज्यानंतर चंद्रतालहून बातल (समुद्रसपाटीपासून ३९१० मीटर उंच) मार्गे मनालीहून अनेकजण परतीचा प्रवास सुरु करतात. आम्हीसुद्धा त्याच अनेकजणांपैकी एक होतो. काझापासून चंद्रतालला जाण्यासाठी असणारा एक पर्याय म्हणजे बातल पर्यंत पोहोचवणारी हिमाचल परिवहन मंडळाची बस. जी पहाटे पाच वाजता काझा बस आगारातून सुटते.

बोचरी थंडी, त्यात काझाची हवीहवीशी वाटणारी हवा आणि तिथला पाहुणचार या सर्व गोष्टींनी आम्ही इतके भारावून गेलो होतो, की पहाटेची बस आमच्यासाठी फक्त विचारपूस करण्यापुरताच आखला गेलेला बेत ठरली. बस निघून गेल्यामुळे आम्ही शेअरिंग तत्वावर इतर काही पर्यटक मंडळींच्या साथीने काझा ते थेट मनाली अशी टेम्पो ट्रॅव्हलर बुक केली. ‘बेस्ट डिल’ होतं ते या सहलीतलं. चंद्रतालपासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत खासगी वाहनं नेता येतात तिथून पुढे एक छोटासा ट्रेक करावा लागतो. त्या सुरेख वातावरणात एकामागून एक सरळ रेषेत आम्ही सर्वजण चंद्रतालच्या दिशेने गेलो. त्या ठिकाणचं सौंदर्य डोळ्यांमध्ये साठवून झाल्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. आम्हा अकरा जणांपैकी सहाजणांनी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही मात्र पुढे मनालीला येणार होतो.

चंद्रताल पाहण्याच्या उत्साहात आम्ही दुपारचं जेवण घेतलं नव्हतं. संध्याकाळचे पाच वाजले आणि फक्त फोटो काढून आपलं पोट भरणार नाही याची जाणिव आम्हा सर्वांनाच झाली. परतीच्या प्रवासाला निघालो असताना आमची ट्रॅव्हलर बऱ्यापैकी रिकामी झाल्यामुळे रस्त्यावर चांगलीच डुलत होती. काही अंतर पार केल्यानंतर चालकाने बातल नावाच्या एका ठिकाणी आमची गाडी थांबवली. ‘इथे जेवून घ्या’, असं तो म्हणाला. ज्या ‘चाचा- चाचीं’विषयी मी त्या प्रवासात खुप ऐकलं होतं, त्यांच्याच ‘चंद्रा ढाबा’ सध्याच्या घडीला जो ‘चाचा- चाची ढाबा’ या नावाने ओळखला जातो त्या ठिकाणी आम्ही आलो.
दोर्जे बोध आणि त्यांची पत्नी हिशे चोमो Dorje Bodh and his wife Hishe Chhomo हे सध्याच्या घडीला स्पिती व्हॅली आणि चंद्रतालच्या सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांचे हक्काचे चाचा- चाची. ‘चाचा खानेमे क्या है?’, असं विचारलं असता ‘दाल- चावल है’, असं ते म्हणाले. आम्ही तिच ऑर्डर दिली आणि त्या उबदार ढाब्यामध्ये बसलो. मी बराच वेळ तिथलं वातावरण पाहात होते. स्टोव्हवर चहा कढत होता. काहीजण उत्साहीपणे काम करणाऱ्या त्या जोडीकडे मोठ्या कुतूहलाने पाहात होते, कुणी नुकतच आत येणारं थेट त्यांच्या चुलीपाशी उभे राहत होते. हे सर्व वातावरण त्या चाचा- चाचींसाठी त्यांच्या जीवनशैलीचा भाग झालं होतं. अनेक गोष्टींकडे पाहतानाच एका मुलाने पुढ्यात खाणं आणून ठेवलं. तिथे डाळ म्हणजे राजम्याची आमची होती. भरपूर लांब दाण्याच्या तांदुळाच्या वाफाळत्या भातावर ती गरमागरम आमटी आम्ही इतक्या पटापट खाल्ली की विचारुन सोय नाही. त्यानंतर समोर आलेला चहा म्हणजे, त्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत आम्हाला मिळालेला आधारच होता.

chandra dhaba chachi chacha rajma chawal batal

Get set post…- जगातलं सर्वाधिक उंचीवरील पोस्ट ऑफिस भारतात, तुम्ही पाहिलं का?

चाचा- चाची म्हणजे अनेक पर्यटकांसाठी तिथले सेलिब्रिटीच झाले आहेत. येणाऱ्या प्रत्येकाचं हसून स्वागत करणाऱ्या या जोडीने कित्येक वर्षांपासून अनेकांचीच भूक भागवण्याचं काम सुरु ठेवलं आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांनीही घेतली आहे. त्यामुळे तुम्हीही कधी स्पितीच्या वाटेवर गेलात आणि चंद्रतालला भेट देण्याचा बेत आखलात तर बातल येथे थांबून या ‘चाचा- चाचीं’च्या ढाब्याला नक्की भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 2:06 pm

Web Title: spiti valley chandratal lake chacha chachi dhaba is must visit at batal photos
Next Stories
1 महागाईचा भडका : जूनमध्ये घाऊक दरांमध्ये 5.77 टक्क्यांची वाढ
2 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान अचानक मांडव कोसळला, १५ जण जखमी
3 भारताच्या सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अत्यंत कठोर चाचणी
Just Now!
X