शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त दुसऱ्या गावात राहणे ही सध्या असतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. यामध्ये महिलांचेही प्रमाण जास्त असून मोठ्या शहरांमध्ये तर महिलांसाठी खास हॉस्टेल्स असतात. महिलांचे हॉस्टेल असल्याने ते जास्त सुरक्षित असेल असा आपला अगदी स्वाभाविक समज असतो. मात्र या समजाला धक्का लावणारी घटना नुकतीच घडली आहे. चेन्नईमध्ये एका हॉस्टेलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संपत राज या व्यक्तीचे हॉस्टेल असलेल्या रुमचे बल्ब, सॉकेट, हॅंगर यांसारख्या वस्तूंवर हे गुप्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी राहणाऱ्या महिला आणि मुलींचे रेकॉर्डिंग केले जात असल्याची धक्कादायक माहिती याठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने दिली आहे. याबाबत तिने तक्रारही दाखल केली आहे. इतकेच नाही तर या व्यक्तीने आपल्या घड्याळातही अशाप्रकारे गुप्त कॅमेरे बसवले आहेत.

संपत हा इंजिनिअर असून रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करण्याच्यादृष्टीने तो गावाकडून चेन्नईमध्ये आला. मात्र या कामात त्याला मोठ्या प्रमाणात अपयश आले. मग त्याने आपले घर भाडे तत्त्वावर महिलांना राहण्यासाठी देण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने इंटरनेटवर जाहिरात दिली. त्या जाहिरातीवरुन अनेक महिलांनी त्याला संपर्क केला. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा महिला ३ घरांमध्ये राहायलाही आल्या. यावेळी तो आपल्या कुटुंबियांना घेऊन जवळच एकेठिकाणी राहायलाही गेला. पण या महिला राहायला येण्याआधी संपत याने घरात वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे बसवले. इंजिनिअर असल्याने त्याने हे कॅमेरे स्वत:च अशाठिकाणी बसवले की ते कोणालाही समजू शकणार नाहीत.

विशेष म्हणजे संपतने महिलांच्या बाथरुममध्ये आवाज रेकॉर्ड होणारे कॅमेरे बसवले. हे कॅमेरे एरवी स्टॅंडबाय मोडमध्ये राहत असले तरीही दरवाजाचा आणि पाण्याचा आवाज आल्यानंतर त्यात फिल्म रेकॉर्ड होते. यामध्ये चार तासांपर्यंतची घटना रेकॉर्ड होऊ शकते. मग पुन्हा हा कॅमेरा स्टँडबाय मोडला जातो. संपत वापरत असलेल्या घड्याळालाही कॅमेरे बसवण्यात आले होते. याच इमारतीत त्याने आपले ऑफीसही थाटले. या महिला घराबाहेर गेल्यानंतर दुसरी चावी वापरुन तो या रुममध्ये जाऊन कॅमेरातील फुटेज गोळा करत असे असे याबाबतची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.