थंड हवेच्या ठिकाणी राहणे मानवी आरोग्यासाठी उत्तम असल्याचा निष्कर्ष नुकताच एका शास्त्रीय पाहणीतून समोर आला आहे. अशाप्रकारचे हवामान शरीरात तपकिरी चरबीचे प्रमाण वाढवून उष्णता निर्माण करते. ज्याचा उपयोग मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ शकतो. शरीरातील तपकिरी चरबीचे प्रमाण कमी-जास्त होण्यासाठी सभोवतालच्या तापमान कारणीभूत ठरू शकते असे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. थंड हवामानात शरीरातील तपकिरी चरबीचे प्रमाण वाढते याउलट, उष्ण हवामानात या चरबीचे प्रमाण कमी होते. तपकिरी चरबीचे प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांचे शरीर बारीक असून त्यामध्ये शर्करेची पातळीसुद्धा कमी असल्याचे यापूर्वीच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळेच थंडीच्या मौसमात शरीरातील तपकिरी चरबीचे प्रमाण ३०ते ४० टक्क्यांनी वाढते असे संशोधकांकडून सांगण्यात आले. चार महिने सुरू असलेल्या या संशोधनात पाच जणांना १९ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअसच्या वेगवेगळ्या तापमानात ठेवण्यात आले. दिवसा हे पाच जण आपले सामान्य आयुष्य जगत, मात्र, रात्री झोपताना या पाच जणांच्या खोलीतील वातावरण नियंत्रित ठेवण्यात येत होते. या संशोधनाअंती थंड तापमानात पाचही जणांच्या शरीरातील तपकिरी चरबीचे प्रमाण वाढल्याचे तर उष्ण तापमानात चरबीचे प्रमाण घटल्याचे समोर आले.