गंगा, यमुना व सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संगमावर प्रयागराज (अलाहाबाद) कुंभमेळा संक्रातीमध्ये सुरू झाला आहे. साधू, भाविक व परदेशी पर्यटक यासह अंदाजे 15 कोटी लोक या वर्षी कुंभमेळ्याला भेट देतील आणि स्नान, मंदिरातील पूजा, धार्मिक गीते, धार्मिक विधी अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होतील, असा अंदाज आहे.

या संपूर्ण उपक्रमाचा भव्यपणा विचारात घेता, आयोजक, पोलीस अधिकारी व आरोग्यसेवा प्रोफेशनल यांनी प्रवासविषयक सल्ला जारी केला आहे. त्यामध्ये, कुंभमेळ्याला येणारे भाविक व पर्यटक इतक्या प्रचंड गर्दीमध्ये कशा प्रकारे सुरक्षित व निरोगी राहू शकतात, यासाठीचे विविध पर्याय दिले आहेत.

कॉक्स अँड किंग्सचे रिलेशनशिप्स प्रमुख करण आनंद यांनी सांगितले, “या वर्षी कुंभमेळ्याला जगभरातील पर्यटकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या भव्य कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी प्रयागराजला येण्याची इच्छा असणाऱ्या पर्यटकांकडून या संदर्भातील चौकशी अजूनही होत आहे. कुंभमेळा उत्तम पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार व आयोजक यांनी उत्कृष्ट तयारी केली आहे. स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे व कुंभमेळ्याचा आनंद घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

पुढे दिलेल्या सात टिप्सचे पालन केल्यास कुंभमेळ्याची तुमची ट्रिप सुरक्षित व सुखरूप होऊ शकते:

भरपूर सामान सोबत नेऊ नका: कुंभमेळ्याला जाताना भरपूर सामान बाळगू नका. केवळ गरजेच्या वस्तू व कपडे इतकेच न्या. यामुळे तुम्हाला फार गोष्टी सांभाळत बसावे लागणार नाही व चोरी होण्याची शक्यताही कमी होईल. हवामानानुसार साजेसे कपडे घाला. तुमच्याकडील सर्व वस्तूंची यादी तयार करा. सोबत किमान एक फोटो आयडी ठेवा.

मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा: पैसे, पेमेंट कार्डे, स्मार्टफोन व दागिने अशा मौल्यवान वस्तू सार्वजनिक ठिकाणी व विशेषतः गर्दीच्या ठिकाणी बाहेर काढू नका. हॉटेलमधून बाहेर पडत असताना, जितके गरजेचे असतील तितकेच रोख पैसे सोबत घ्या. तुमचा फोन शर्ट किंवा हिप पॉकेटमध्ये ठेवू नका. सगळे पैसे सोबत ठेवणे टाळा. काही पैसे तुमच्याजवळ ठेवा व बाकीचे बॅगमध्ये ठेवा. खरेतर, तुमच्याकडील मौल्यवान वस्तू हॉटेलमधील सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ठेवलेल्या बऱ्या. असे केल्यास, चोरी झाली तरी तुमच्याकडे काही पैसे राहतील.

बॅगेला कुलूप घाला: तुमच्या बॅगेला नेहमी कुलूप घालायला विसरू नका. वॉलेट, बॅकपॅक किंवा हँडबॅग बरोबर घेणार असाल तर नेहमी सावध राहा. कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी कसलेले खिसेकापू नक्की फिरत असतात. वॉलेट किंवा हँडबॅगची गरज पडेपर्यंत तुम्हाला लुटले असल्याचे तुमच्या लक्षातही येणार नाही, इतके के तरबेज असतात.

सगळे एकत्र राहा: तुम्ही गटाने प्रवास करत असाल तर शक्य तितका वेळ एकत्र राहा व एकमेकाकडे लक्ष ठेवा. शहरात कोणी मित्रमंडळी किंवा नातेवाईक असतील तर तुम्ही तिथे आल्याचे त्यांना कळवून ठेवा व तुमच्या हॉटेलचा तपशील व फोन नंबर त्यांना देऊन ठेवा.

मोठ्या घोळक्यापासून दूर राहा: मोठ्या जमावापासून किंवा घोळक्यापासून दूर राहणे योग्य ठरेल. कारण, कोणतीही अनपेक्षित घटना घडू शकते, जसे मारामारी, दंगल किंवा चेंगराचेंगरी, आणि तुम्ही त्यामध्ये सापडू शकता.

सावध राहा: अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. व्यवस्थित कपडे असणाऱ्या व मैत्रीपूर्ण वागणाऱ्या व्यक्तींवरही विश्वास ठेवू नका. तुम्ही व्यक्तिशः ओळखत नसलेल्या व्यक्तींशी मैत्री करू नका. त्यांचा खरा हेतू काय आहे, हे तुम्हाला माहीत नसेल.

लसीकरण: मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी जाण्यातील एक सर्वात मोठा धोका म्हणजे, आजाराची लागण होण्याची भीती. कुंभमेळ्याला जाण्यापूर्वी एन्फ्लुएन्झा व टायफॉइडची लस घ्यावी, असा सल्ला मुंबईतील फिजिशिअन डॉ. जयेश लेले भाविकांना देतात. जेवणाच्या बाबतीतही जागरुक राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. “भाविकांनी कच्चे व अर्धवट शिजवलेले अन्न खाऊ नये, अन्यथा त्यांना डायरियाचा त्रास होऊ शकतो आणि त्याच्या संबंधित त्रासही होऊ शकतात, जसे उलट्या, डीहायड्रेशन व ताप. रस्त्यावरील पदार्थ कितीही आकर्षक वाटले तर ते खाण्याचा मोह टाळावा. मिनरल वॉटरची बाटली नेहमी जवळ ठेवावी. अनोळखी व्यक्तींनी दिलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. प्रथमोचार पेटी नेहमी बरोबर ठेवा,” असे डॉ. लेले यांनी सांगितले.