News Flash

स्ट्रॉ

सोडय़ासारख्या पेयात जरा वेळाने कागदाचे तुकडे होऊन जात. त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात प्लास्टिक समोर आले. १९६० मध्ये प्लास्टिकची स्ट्रॉ तयार झाली.

स्ट्रॉचा अर्थ आहे वाळकी काडी. बार्ली, ओट, राय धान्याच्या लोंब्या काढून घेतल्यावर उरणारी धांडे.

दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com
वाचक लेखक
आजकाल हॉटेलमध्ये आणि कुठेकुठे घरीही थंड पेय पिण्यासाठी सर्रास स्ट्रॉचा वापर केला जातो. काम संपले की ती नळी एक तर दुमडून टाकली जाते किंवा वाकवली जाते. आता तिचा पुनर्वापर होणार नाही असे समाधान मिळवले जाते. वापरलेले ते स्ट्रॉ कचराकुंडीत जाऊन पडतात, वर्षांनुवर्षे त्याच अवस्थेत राहण्यासाठी, कारण ते असतात प्लास्टिकचे आणि ते शंभर वर्षे तरी अविघटनशील राहून पर्यावरणाची हानी करत राहणार. फेकून दिलेल्या त्या नळ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात जाऊन पोचल्या तर सागरी जिवांच्या पोटात जाऊन त्यांना त्रस्त करणार. रस्त्यावर पडल्या तर गुराढोरांच्या पोटात तुंबणार.

स्ट्रॉचा अर्थ आहे वाळकी काडी. बार्ली, ओट, राय धान्याच्या लोंब्या काढून घेतल्यावर उरणारी धांडे. पेय पिण्यासाठी वापरली जाणारी नळी प्लास्टिकची तरी तिला स्ट्रॉ का म्हणायचे? कारण इ.स. १८०० च्या सुमारास राय धान्याची पोकळ दांडी कापून पेय ओढण्यासाठी वापरायला सुरुवात झाली होती. १८४२ साली ओहियो येथे जन्मलेला स्टोन हा पत्रकार राजधानी वॉशिंग्टन येथे पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरला, त्यावेळी तिथे लोकप्रिय असलेल्या, मिंट ज्युलेप या पेयाच्या प्रेमात पडला. वॉशिंग्टनच्या ‘अमान’ या प्रसिद्ध रेस्टराँत तो हे पेय पिण्यास जाई. तिथे पेयाच्या ग्लासात रायची नळी टाकून ते पेय दिले जात असे. पण पेयात त्या नळीचा अर्क उतरून त्याची चव बदलत असे. गंमत बिघडत असे. पूर्वाश्रमात स्टोन सिगरेट होल्डरच्या उत्पादनाचे काम करत होता. त्या अनुभवावरून कागदाची पुंगळी करून त्याने पेय ओढले तर रायची नळी टाळता येईल ही कल्पना त्याला सुचली. त्याने पेन्सीलभोवती कागद गुंडाळला. गुंडाळी सुटून जाऊ नये म्हणून कागदाचे टोक डिंकाने चिकटवले. झाली पेय पिण्याची नळी तयार! ती कागदापासून तयार होत असली तरी तिचे मूळ नाव स्ट्रॉ हे कायमच राहिले. आजतागायत. सुरुवातीला तयार केलेल्या नळ्या त्याने हॉटेलच्या ताब्यात दिल्या. त्या फक्त त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी होत्या. हॉटेलमध्ये येणारे इतर ग्राहक स्टोनला तशा नळीतून पेय पिताना पाहून विस्मयचकित होत. आम्हालाही तशी नळी मिळावी अशी मागणी ते करू लागले. ते पाहून स्टोनने नव्या स्ट्रॉचे पेटंट घेतले. सुमारे दोन वर्षांत त्या लोकप्रिय झाल्या. खास करून औषध विक्रेत्यांच्या दुकानात फसफसणारा सोडा बनविणारी यंत्रे बसू लागल्यावर नळ्यांचा खप खूप वाढला. १८८९ मधील एका लेखानुसार स्टोनच्या कारखान्यातून रोज २० लाख नळ्यांचे उत्पादन होत होते. मध्यंतरी स्टोनने डिंकाऐवजी मेणाचा वापर सुरू केला होता.

रायच्या स्ट्रॉमुळे पेयाच्या बिघडणाऱ्या चवीचा प्रश्न स्ट्रॉमुळे मिटला होता. तरी कागदाच्या स्ट्रॉमुळे दुसरी अडचण समोर येत होती. सोडय़ासारख्या पेयात जरा वेळाने कागदाचे तुकडे होऊन जात. त्यावर उपाय शोधण्याच्या प्रयत्नात प्लास्टिक समोर आले. १९६० मध्ये प्लास्टिकची स्ट्रॉ तयार झाली. तिच्या पारदर्शकतेमुळे आणि न विरघळण्याच्या गुणामुळे ती लगेच लोकप्रिय झाली. कागदी नळी बाद झाली. प्लास्टिकच्या वापरलेल्या नळ्या केराच्या कुंडीत भर टाकू लागल्या. त्यांच्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. निसर्गस्नेही स्ट्रॉच्या शोधात बांबूची स्ट्रॉ पुढे आली.

ब्रश विथ बांबू नावाची एक अमेरिकन संस्था टूथब्रश तयार करत होती. त्यांनी बांबूची स्ट्रॉ बाजारात उतरवली. ही स्ट्रॉ भारतातून हस्त उत्पादन म्हणून करून घेतली जात होती. (भारताच्या बाजारपेठेत ती कधीच आली नाही.) तशी ती महागच होती. डझनला २० डॉलर म्हणजे एका नळीला डॉलरहून अधिक.

वेगवेगळे स्ट्रॉ तयार करण्याची अहमहमिकाच अमेरिकन कंपन्यांत सुरू झाली. धातूचे, काचेचे, कसले कसले असे टिकाऊ स्ट्रॉ एका वापरानंतर फेकता येत नव्हत्या. धुऊन पुसून वापरण्यासाठी ते पर्समध्ये वा हँडबॅगमध्ये ठेवावे लागत. असून अडचण- नसून खोळंबा.

एका उत्पादकाने मक्याच्या पिठाचे स्ट्रॉ तयार केले. विघटनशील असल्याने फेकून दिल्यावर ते लवकर नाहिसे होत. त्यानंतर तर बिस्किट स्ट्रॉ, कँडी स्ट्रॉ तयार झाल्या. पेय संपल्यावर ते खाऊन टाकायच्या. प्लास्टिक स्ट्रॉनी ज्याला खो दिले ते पेपर स्ट्रॉ आता परत आले आहेत.
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 12:37 pm

Web Title: straw lokprabha article
Next Stories
1 नॅनोकण तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिओचे एकच इंजेक्शन
2 भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सची जबरदस्त सफारी स्टॉर्म कार
3 Samsung Galaxy J6 भारतात दाखल
Just Now!
X