देशात कोविड 19 व्हॅक्सिनचा दुसरा टप्पा सुरू झालाय, पण काहीजण अजूनही सोशल मीडियावर व्हॅक्सिनबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. अशात माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने याविरोधात कठोर पाउलं उचलायला सुरूवात केली आहे.

कोविड 19 व्हॅक्सिनबाबत खोटी किंवा चुकीची माहिती असणाऱ्या ट्विट्सना लेबल करायला कंपनीने सुरूवात केली आहे. करोना व्हॅक्सिनबाबत चुकीची किंवा खोटी माहिती पसरवू नये यासाठी बनवलेल्या धोरणांचं उल्लंघन केलं जातंय का हे तपासण्यासाठी काही पर्यवेक्षकांची मदत घेतली जात असल्याचंही कंपनीने सांगितलं. तसेच, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अकाउंटवर कारवाईसाठी ‘स्ट्राइक सिस्टिम’चा वापर करणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं.

‘स्ट्राइक सिस्टिम’अंतर्गत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पहिल्यांदा स्ट्राइक आल्यास काही कारवाई होणार नाही. पण, एकाच अकाउंटवर दोन किंवा तीनवेळेस स्ट्राइक आल्यावर 12 तासांसाठी ते अकाउंट लॉक होईल. चार वेळेस स्ट्राइक आल्यास अकाउंट सात दिवसांसाठी लॉक होईल, तर पाच किंवा त्यापेक्षा जास्तवेळेस नियमांचं उल्लंघन केल्यास युजरचं अकाउंट कायमस्वरुपी ब्लॉक होईल, एका ब्लॉग पोस्टद्वारे कंपनीने ही माहिती दिली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्येही कंपनीने करोनाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली होती.