26 September 2020

News Flash

गरम चहा पिणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो, संशोधकांचा दावा

तुम्हाला गरम चहा प्यायला आवडतो का?

गरम चहा

तुम्हाला गरम चहा प्यायला आवडतो का? जर या प्रश्नाला तुमचे उत्तर हो असेल तर वेळीच तुम्हाला ही सवय मोडण्याची गरज आहे. नेहमी गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते असं निरिक्षण एका संशोधनामध्ये अभ्यासकांनी नोंदवले आहे.

इराणमधील तेहरान वैद्यकीय विद्यापिठातील अभ्यासकांनी गरम चहा पिण्यासंदर्भात अभ्यास केला आहे. हा अहवाल ‘द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. चहा संदर्भातील हे संशोधन तब्बल १५ वर्षे सुरु होते. २००४ ते २०१७ या कालावधीमध्ये संशोधकांनी ४० ते ७५ वयोगटातील ५० हजार ४५ जणांचा अभ्यास केला. यामधील ३१७ जणांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्याचे अभ्यासानंतर समोर आले.

काय आहे संशोधनामधील माहिती

दिवसाला ६० डिग्री सेल्सियस किंवा त्याहून अधिक तापमान असलेला ७०० एमएल किंवा त्याहून अधिक चहा पिणाऱ्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका ९० टक्क्यांनी वाढतो. या संशोधनामध्ये ६० डिग्रीहून अधिक तापमान असणाऱ्या चहामुळे कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे म्हटले असले तरी जागतिक आरोग्य संघटनेनुसार ६५ डिग्रीहून अधिक तापमान असणारे गरम पेय (चहा, कॉफी आणि इतर) प्यायल्यास अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

अनेक लोकांना गरम चहा, कॉफी तसेच इतर गरम पेय पिण्याची आवड असते. मात्र आमच्या अहवालानुसार खूप गरम चहा प्यायल्याने अन्ननालिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच गरम पेय थोडी थंड झाल्यानंतरच त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे असते, असे मत या संशोधनाचे नेतृत्व करणारे अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे सदस्य असणाऱ्या डॉ. फरहाद इस्लामी यांनी नोंदवले आहे.

२०१८ मध्ये फेब्रुवारी महिन्यात ‘अॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसीन’मध्ये चीनमधील संशोधकांनी गरम चहाबद्दल केलेल्या संशोधनाचा अहवाल छापून आला होता. या अहवालानुसार गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका पाच पटींने वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले होते. मात्र हे संशोधन तंबाखू सेवन करणाऱ्यांसंदर्भातच होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 4:28 pm

Web Title: study links drinking hot tea with elevated esophageal cancer risk
Next Stories
1 ‘जीमेल’च्या या फिचरद्वारे पाठवू शकता सीक्रेट ई-मेल
2 World Water Day: उभं राहून पाणी पिणे म्हणजे ‘या’ आजारांना आमंत्रण देणे
3 World Water Day: अति पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक
Just Now!
X