पावसाळ्यात कुठे छान फॅशन करता येते, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. थोडा विचार केला तर पावसाळ्यातही आपल्याला हवी ती फॅशन करता येते. पावसाळ्यातील छान थंडगार हवा, रिमझिम पाऊस अशा वातावरणात अनेकजण मित्रमंडळींबरोबर लाँग ड्राइव्हला, पिकनिकला जायचे प्लॅन्स करत असतात. तर काहींना रेग्युलर ऑफिस, मीटिंग अटेंड करायच्या असतात. अशा वेळी कोणते फुटवेयर आणि अ‍ॅक्सेसरीज वापरावे, ते कसे स्टाइल करावे हे आपल्याला माहीत असायला हवे.

पावसाळ्यात बाहेर जायचं म्हटलं की रेनकोट, छत्र्या, पावसाळी चपला कपाटाबाहेर पडायला लागतात. या सगळ्यांबरोबर प्रसंगी काय स्टाइल करावी हा प्रश्न पडतो. अनेक वेळा ट्राय करूनही परफेक्ट लूक सापडत नाही. मग हाताला लागेल ते घालून आपण बाहेर पडतो. अशा वेळी प्लॅनिंग महत्त्वाचा भाग बनून जातो. आपल्या बिझी जीवनात केवळ एखाद्या लुकसाठी प्लॅनिंग करणं म्हणजे वेळ फुकट गेला असं काहींना वाटतं. पण केवळ १५ मिनिटं ते अर्धा तासात तुम्ही तुमचा लुक ठरवू शकता. पण थोडंसं डोकं मात्र खाजवावं लागेल.

फूटवेअर

१. अँकल बूट्स

कॉलेजला जाताना, एखाद्या ट्रेकवर जाताना किंवा इन्फॉर्मल मीटिंगला जाताना रबरी अँकल बूट्स अगदी साजेसे दिसतील. इन्फॉर्मल मीटिंगसाठी जाणार असाल तर पलाझो पँट्स, स्कर्ट्स, स्ट्रेट पॅण्ट्स अशा कोणत्याही आऊटफिटबरोबर हे बूट्स वापरू शकता. पिकनिकला किंवा आऊटिंगला जाताना हाफ पॅण्ट, नी लेन्थ ड्रेस, याबरोबर हे अँकल बूट्स शोभून दिसतील. हे बूट्स सध्या खूप ट्रेण्ड इन आहेत. ते आपल्या पायांचं संरक्षण तर करतातच, बरोबरीने फॅशन स्टेटमेंट म्हणून सुद्धा अगदी योग्य आहेत. हे बूट्स घेताना आपण कशासाठी आणि कशावर घालणार आहोत ते लक्षात घेऊन रंग निवडावा. ब्लॅक, ब्राऊन, मरून हे कलर नेहमीच चांगले दिसतात.

२. ब्लॉक हिल्स

ऑल सिझन ब्लॉक हिल्स सध्या खूप ट्रेण्ड इन आहेत. मुळातच क्लासी असलेली हे ब्लॉक हिल फूटवेयर एखाद्या फॉर्मल ड्रेसबरोबर किंवा रेनीजॅकेट आणि पॅण्ट्सबरोबर टीम अप होऊ शकतात. फुल शर्ट, कुर्ती, कुलॉट्स, डेनिम्स या सगळ्यावर बॉक्स हिल्स मस्त दिसतील. हा ऑफिसला जाण्यासाठी परफेक्ट लुक आहे. सोबतच क्लासी लुक मिळेल. ऑकर, नेवी ब्लू, मारून, ब्राऊन, व्हाइट आणि क्लासी ब्लॅक या कलरमध्ये हे फूटवेयर तुम्ही घेऊ शकता.

३. स्नीकर्स

खूप आधीपासून सुरू झालेला स्नीकर्सचा ट्रेंड पावसाळ्यातही मागे पडलेला नाही. कोणत्याही आऊटफिटसाठी स्नीकर्स साजेसे आहेत. पावसाळ्यात पायांचे संरक्षण करतानाच ट्रेण्डी लुकमधील स्नीकर्स खास पावसाळ्यानिमित्त बाजारात पाहायला मिळत आहेत. हे स्नीकर्स खास मान्सून फ्रे ण्डली मटेरिअलपासून बनले आहेत आणि पायाला कम्फर्टेबल आहेत. ट्रेकिंगला जाण्यासाठी, पिकनिकसाठी किंवा खास मान्सून लंच, डिनरला जाण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. ट्रेकिंग सूट, वेल फिटेड टाइट्स आणि लूज टीशर्ट या पिकनिक व ट्रेकला जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आउटफिटसाठी स्नीकर्स एकदम बढिया दिसतील. लंच किंवा डिनरला जाताना पार्टीवेयर किंवा कॅज्युअल ड्रेसेस, शर्ट, प्लिटेड स्कर्ट्स, क्रोप टॉप्स आणि डेनिम पॅण्ट्स याबरोबर स्नीकर्स खूपच क्लासी दिसतील.

एक्सेसरीज

१. स्कार्फ

स्कार्फ एक एक्सेसरी म्हणून आपण वापरू शकतो. स्कार्फ वेगवेगळ्या पद्धतीने बांधून मस्त लुक मिळतो. जॅकेट, कोट्स याबरोबर स्कार्फ मस्त दिसेल. स्कार्फ गळ्यात टाकून त्याची दोन्ही टोके बेल्टमध्ये टक इन करू शकता. प्लेन ड्रेसेस, टॉप्स जम्प सूट्स यावर ते खूप छान दिसतील. युनिक लुक मिळेल. किंवा स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून त्याचा एक छान लुक तयार होऊ शकतो. सिम्पल नॉटेड स्कार्फ किंवा टायसारखा स्कार्फसुद्धा छान लुक मिळवून देतात.

२. गोंडेदार ज्वेलरी

सध्या गोंडेदार ज्वेलरी खूप मोठय़ा प्रमाणावर ट्रेंडमध्ये आहे. रंगीत लहान मोठय़ा आकाराची गोंडे जडवलेली ज्वेलरी पावसाळ्यातही कपडय़ांवर नक्कीच छान दिसेल. आपल्या आउटफिटला कॉन्ट्रास्ट किंवा मिस मॅच करून गोंडेदार ज्वेलरी वापरता येईल. आपल्या आवडीनुसार गोंडेदार ज्वेलरी पावसाळी आऊटफिटवर किंवा पार्टीसाठी जाताना तुम्ही वापरू शकता. ऑफिसला जाताना गोंडेदार ज्वेलरी अतिभडक नसावी, आपल्या ऑफिसवेयरला साजेशी अशी ज्वेलरी घालावी. टॅसल ज्वेलरी ऑफिससाठी योग्य ठरेल.

३. बोहेमियन ज्वेलरी

ही ज्वेलरी ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. वेगवेगळे रंगीत स्टोन्स, ब्लॅक सिल्वर यांपासून ही ज्वेलरी बनते. बोहेमियन पद्धतीचे अनेक नेक पिसेस, मोहक इयिरग्स, अँकलेट्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. तरुण मुलींमध्ये या प्रकाराला जास्त पसंती आहे. रंगाचं बंधन नसल्याने ही ज्वेलरी जास्त वापरली जाते.

अशा वापरा अ‍ॅक्सेसरीज 

* स्कार्फची स्टाइल ठरवताना आपण काय पद्धतीचा आऊटफिट घातला आहे ते बघून स्कार्फ स्टाइल करावा.
स्कार्फ आणि कपडय़ांच्या रंगसंगतीकडे नक्कीच लक्ष द्यावे.

* गोंडय़ाची ज्वेलरी घालताना शक्यतो कपडय़ाशी मिळतीजुळती कॉन्ट्रास्ट ज्वेलरी घालावी.

* हाय नेक किंवा कॉलर असलेला आउटफिट असेल तर लॉन्ग नेकपीस किंवा कॉलरलगत एखादा नेकपीस घालावा, क्लासी लुक मिळेल.

* कोट घालणार असेल तर आतील कपडय़ाला साजेशी ज्वेलरी घालावी. लॉन्ग बोहेमियन नेकपीस कोट्सबरोबर मस्त टीम अप होईल.

* ऑफिसला जाताना गोंडेदार ज्वेलरी अतिभडक नसावी, आपल्या ऑफिसवेयरला साजेशी अशी ज्वेलरी घालावी. टॅसल ज्वेलरी ऑफिससाठी योग्य ठरेल.

प्राची परांजपे
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा