17 January 2021

News Flash

फॅशनबाजार : केसांची आगळी स्टाइल!

शॉर्ट हेअर्समुळे मोठा चेहरा अजूनच मोठा दिसू शकतो.

एके दिवशी खुशीत तुम्ही ब्युटीपार्लरमध्ये शिरता. ‘वर्षभर मेहनतीने वाढविलेल्या केसांना कात्री लावायची हीच ती वेळ’ असं तुम्ही ठरविलेलं असतं. डोळ्यासमोर कतरिना, दीपिकापासून एमा वॉटसनपर्यंत प्रत्येकीचे हेअरकट येऊन गेलेले असतात आणि मग तुम्हीही ठरविता, ‘आज कुछ हटके ट्राय करेंगे.’ ब्युटीशियनसमोरच्या खुर्चीत बसल्यावर तिचा पहिला प्रश्न असतो, ‘मॅम कोणता कट करू, लेअर की स्टेप्स?’ आणि तुमच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरतं. दरवर्षी बदलणाऱ्या हेअरकट स्टाइल्सबद्दल तुम्हाला स्वत:हून ब्युटीशियनला सांगावं लागतं. त्यासाठी ‘हेअरकट सज्ञानता’ हवीच.. ‘आमच्या काळी ना, हे असं नव्हतं,’ आजी काय आईच्या मुखीसुद्धा हे वाक्य आलं, की आपल्याला पुराणातल्या गोष्टी ऐकाव्या लागणार, याचा अंदाज यायला लागतो. एरवी ‘तुमचा काळ गेला,’ असं त्यांना ठणकावून सांगणाऱ्या आपण हेअरकटच्या बाबतीत मात्र अजूनही त्यांच्याच काळातील स्टेपकट, लेअरकटवरच अडकलेलो आहोत. आता मात्र आपल्या हेअरकट्सच्या यादीमध्ये नवी नावं नोंदवायची वेळ आली आहे.

बॉबकट

तुम्हाला शॉर्ट हेअर आवडत असतील, तर यंदाच्या हेअरकट ट्रेंड्समधील बॉबकट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. चेहऱ्याच्या लांबीचे केस सोबत फ्रिंजेस किंवा बँग्स हे बॉबकटचं समीकरण आहे. पण यात तुमच्या चेहरेपट्टीनुसार बरेच बदल करता येतात. तुमचे केस नैसर्गिकरीत्या सरळ असतील किंवा हेअर स्ट्रेटनिंग केलं असेल, तर ‘ब्लंट बॉब’कट करता येईल. यात केस एकाच लांबीत कापले जातात. केसांना वेव्ह्ज असतील तर बॉबकटमध्ये थोडे लेअर देऊन ‘अँगल बॉब’ करता येतो. एरवी आपण फ्रिंजेस छोटे आणि लांब केस असा लूक करतो. पण त्याऐवजी लांब फ्रिंजेस आणि बाकीचे केस शॉर्ट ठेवून ‘रिव्हर्स बॉब’कट करता येऊ  शकतो. बॉबकटसाठी तुमचा चेहरा लहान किंवा मध्यम आकाराचा हवा. वर्तुळाकार चेहरेपट्टीला हा हेअरकट शोभून दिसतो. पण शॉर्ट हेअर्समुळे मोठा चेहरा अजूनच मोठा दिसू शकतो.

बँग्स आणि लेअर्स

पारंपरिक लेअरकट हे बहुतेक हेअरकट्सचं मूळ आहे. त्यामुळे त्याला मरण नाही. पण त्यात विविधता नक्कीच आणता येते. एरवी लेअरकटसोबत फ्रिंजेस ठेवले जातात. पण त्याऐवजी यंदा बँग्स ठेवून बघा. विशेषत: अध्र्या कपाळाच्या लांबीचे ‘बेबी बँग्स’ सध्या ट्रेंडमध्ये आहेत. केसांना वरून लेअर देण्याऐवजी मधल्या भागापासून लेअर देण्यास सुरुवात करा. ‘लॉंग लेअर’च्या या प्रकाराने केसांची लांबी जास्त दिसण्यास मदत होते. तसेच संपूर्ण केस एका लांबीचे ठेवून केवळ टोकाकडे लेअर दिलेला ‘सॉफ्ट अंडरकट’ पण यंदा ट्रेंडमध्ये आहे. यंदा मानेच्या खाली पण बस्टलाइनच्या वर असलेली ‘मिडलेंथकट’ लांबी पसंत केली जातेय.

कर्ल्स आणि नॅचरल वेव्ह्ज

एखाद्या रात्री वेणी किंवा बो बांधून झोपलो, की सकाळी केसांना वेव्ह्ज येतात. एरवी आपल्याला हे वेव्ह्ज नकोसे वाटतात. पण हेच नॅचरल वेव्ह्ज सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे रात्री केस बांधून झोपायला विसरू नका. विविध प्रकारचे कर्ल्स यंदा ट्रेंडमध्ये आहेत.

पिक्सलकट

तुम्हाला संपूर्ण मेकओव्हर हवा असेल, तर पिक्सलकट हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ‘बॉयकट’च्या पठडीतला हा कट दिसायला स्मार्ट दिसतोच, पण त्याची हेअरस्टायलिंगची खटपटसुद्धा फारशी नाही. कितीही विस्कटलेले केस असले, तरी त्यात सुंदर दिसतात. एमा वॉटसनचा पिक्सलकट मध्यंतरी बराच गाजला होता.

क्लासी हेअरकलर्सउ

हेअरकट्समध्ये ट्विस्ट आणायचा असेल, तर हेअरकलरिंगचा तडका हवाच. यंदा क्लासी हेअरकलर्स ट्रेंडमध्ये आहेत. फारसे डोळ्यात न भरणारे, नॅचरल लूकचे पण किंचित स्पाईस भरणारे हे हेअरकलर्स कॉलेज आणि ऑफिसमध्येही सहज मिरविता येतील. बहुतेक भारतीय स्त्रियांचे केस गडद ब्राऊन असतात. त्यात किंचित ‘कॅरमल टच’ देऊन केसांचा बाऊन्स वाढविता येतो. ‘हनी टू डार्क ब्राऊन’ शेडमधील हायलाइट्स हा सीझन गाजवताहेत. एकाच रंगाच्या तीन-चार शेड्स घेऊन केलेला डार्क टू लाइट ‘ओम्ब्रे’ लूक यंदा ट्रेंडमध्ये आहे. केसांना स्ट्रेटनिंग असल्यास हा लूक अजूनच शोभून दिसेल. ‘बर्गंडी’ शेड यंदा हेअरकलरमध्ये बराच पसंत केला जातोय. कतरिनाने नुकतेच या लूकने सर्वाना ‘फितूर’ केलंय. हायलाइट्स किंवा पूर्ण हेअरकलरिंगमध्ये तुम्ही बर्गंडी रंग वापरू शकता. हेअर कलर उठून दिसावा म्हणून बऱ्याचदा ब्लीच करून केसांचा मूळ रंग काढला जातो. त्यामुळे केसांच्या मुळांना हानी पोहचते आणि मूळ रंगही खराब होतो. त्यामुळे हेअर कलरिंग करताना तुमच्या विश्वसातल्या ब्युटीशियनशी व्यवस्थित बोलून घ्या.

हेअरकट कुठे करावा?

चांगला हेअरकट हे ब्युटीशियनच्या कौशल्यावर अवलंबून असतं. कित्येकदा लोकल ब्युटीपार्लरमध्ये ब्रँडेड सलूनपेक्षा उत्तम हेअरकट करून मिळतो. पण या ट्रेंडी हेअरकट्ससाठी ब्रँडेड सलूनची वारी करणं उत्तम ठरू शकतं. तुमची नेहमीची ब्युटीशियन हे नवे हेअरकट्स करू शकत असेल, तर प्रयोग करायला हरकत नाही. पण त्यांना आधी या हेअरकट्सची आणि त्याने मिळणाऱ्या लुक्सची पूर्ण माहिती असायला हवी. ब्रँडेड सलूनमध्ये साधारणपणे ५०० ते १००० रुपयांमध्ये हे हेअरकट करून मिळतील. हेअर कलरिंगचा खर्च ५,००० रुपयांपर्यंत येऊ  शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2016 3:25 am

Web Title: stylish haircut of woman
Next Stories
1 बालपणात अल्झायमर जनुकांमुळे मेंदू आकुंचनाचा धोका
2 पास्तामुळे लठ्ठपणावर नियंत्रण
3 फळे खा, आनंदात राहा!
Just Now!
X