News Flash

करोना काळात नोकरी सोडून ‘ती’ झाली आत्मनिर्भर; ‘मेड इन कोकण’ नेलं पार गुजरातपर्यंत

वाचा तिचा 'आत्मनिर्भर' बनण्यापर्यंतचा प्रवास

करोना काळात नोकरी सोडून ‘ती’ झाली आत्मनिर्भर; ‘मेड इन कोकण’ नेलं पार गुजरातपर्यंत

अनेकदा एखादा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं की प्रत्येकासमोर अडचणींचा डोंगर उभा असतो. पण तुमच्याकडे जिद्द आणि इच्छा असेल तर तुम्ही त्यावर मात करत यशाला गवसणी घालू शकता. पण सध्या भवतालची परिस्थिती आणि करोना या गोष्टींनी मात्र सर्वांच्याच अडचणींमध्ये वाढ केली आहे. एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. पण आपली सुरू असलेली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं आणि तेही या करोनाच्या काळात म्हणजे खुपच मोठं आव्हान. पण हे आव्हान लिलया पेललं ते म्हणजे मुंबईत राहणाऱ्या निलांबरी सावंत हिनं.

निलांबरीनं इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. गेली १० वर्षे या क्षेत्रातही तिनं यशाची शिखरं गाठली. मुंबई, पुणे, देहरादून, दिल्ली, अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी तिनं काम केलं. पण व्यवसाय आणि कोकण हे तिला खुणवत होतं. खऱ्या अर्थानं तिच्यातील व्यावसायिक जागा झाला तो लग्नानंतर. निलांबरीच्या सासू माधवी सावंत या तिच्या व्यवसायासाठी निमित्त ठरल्या. माधवी सावंत यांना लाडू, घरच्या घरीच पापड असे अनेक पदार्थ तयार करण्याची आवड. हेच पदार्थ आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना आवडतात तर ते इतरांपर्यंत का पोहोचवायचे नाहीत? याच विचारावर खऱ्या अर्थानं या व्यवसायाची सुरूवात झाली. लाडू, घरात तयार केलेले पापड, चटणी अशा अस्सल कोंकणी पदार्थांपासून निलांबरीनं आपला व्यवसाय सुरू केला.


करोनामुळे संपूर्ण जग संथगतीनं चालत असताना आपली नोकरी सोडून व्यवसाय सुरू करणं हे खऱ्या अर्थानं आव्हानात्मक होतं. काही महिने घरी थांबावं लागलं असलं तरी हातची नोकरी सोडायची का? आणि व्य़वसायात उतरावं का अशी धाकधुक मनात होतीच, असं निलांबरीनं लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितलं. पण तिचा नवरा सिद्धेश सावंत आणि सासरे नंदकिशोर सावंत यांनीदेखी पाठिंबा दिला. मनात अशीच धाकधुक सुरू असताना अचानक एका दिवशी आपल्या ऑफिसमध्ये फोन करून राजीनामा दिल्याचं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं व्यवसायाची म्हणजेच ‘स्वराज एन्टरप्राईझेस’ची सुरूवात झाल्याचं ती म्हणाली.

व्यवसायात उतरण्यापूर्वीच कोकणातील पदार्थ आणि कोकणाशी आपली जोडलेली नाळ तुटली जाऊ नये हे निलांबरीनं मनाशी ठरवलं होतं. त्यामुळे आपल्या घरी तयार होणाऱ्या पदार्थांव्यतिरिक्त कोकणात तयार होणाऱ्या पदार्थांचा आस्वाद मुंबईकरांना देण्याचा तिनं निर्णय घेतला. मग तयारी सुरू झाली ती हे ‘मेड इन कोकण’ स्टाइल पदार्थ घ्यायचे कोणाकडून याची. यासाठी तिनं इंटरनेटचा पुरेपूर वापर केला. त्यानंतर एका कंपनीची निवड करून तिनं त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडे तयार होणारे पदार्थ तिनं आपल्या दुकानात विक्रीसाठी आणले.


कोकणातील पदार्थ, घरचे स्वतःतयार केलेले मसाले, लाडू, चटणी, ड्रायफ्रूट, स्नॅक्स, सरबत, कोकम यासंह अनेक पदार्थांचा आस्वाद आपल्याकडेही घेता यावा यासाठी केलेली ही धडपड असल्याचं निलांबरी सांगते. पदार्थ आणण्यापासून ते लोकांच्या घरांपर्यंतही पोहोचवण्याचं काम तिच स्वत: करते. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि गुजरात या ठिकाणांहून आज तिच्या अनेक पदार्थांना मागणीही आहे.

व्यवसायात उतरल्यानंतर अनेकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलल्याचं ती सांगते. काही लोकं अशी असतात जी आम्हाला प्रोत्साहन देतात. पण ज्यांना ही गोष्ट रुचतही नाही अशीही लोकं आपल्याला भेटतात. काही जणांनी आपल्या दुकानात मिळणारे पदार्थ तुमच्याकडे ठेवा, आमची फ्रेंचायझी घ्या इतकही या काही महिन्यांच्या कालावधीत सांगितलं आहे. पण घरच्यांच्या संपूर्ण पाठिंबा आणि मनात जिद्द असल्यामुळे अशा कोणासमोरही झुकायचं नाही असं ठरवलं असल्याचंही निलांबरी म्हणते. पुढील काळात अनेक लोकं आपल्याशी जोडले जावेत आणि आपल्याद्वारेही काही लोकांना रोजगार मिळावा अशी इच्छा असल्याचंही तिनं बोलताना सांगितलं. आठ महिन्यांचं तान्हुलं बाळ स्वराज, आपला संसार आणि व्यवसाय हे सांभाळणं खरंच तारेवरची कसरत असते. पण मनाशी जिद्द असली की सर्वकाही शक्य असतं. ज्यांना कोणाला व्यवसायात उतरायचं असेल त्यांनी आत्मविश्वास बाळगून स्वत:च्या कुटुंबीयांवर विश्वास ठेवून बिंधास्त व्यवसायात उतरावं असा सल्लाही निलांबरी देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2020 4:45 pm

Web Title: success story of nilambari sawant konkani food started business left interior designer job exclusive jud 87
Next Stories
1 एका तासाचं भाडं 149 रुपये, Uber ने भारतात सुरू केली ‘ऑटो रेंटल’ सर्व्हिस
2 मध खाण्याचे ‘हे’ ११ गुणकारी फायदे माहित आहेत का?
3 घरच्या घरी असे तयार करा नैसर्गिक पद्धतीचं ब्लीच
Just Now!
X