लठ्ठ व्यक्ती आपले वजन घटवण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न करत असतात. त्यांच्या बेढबपणावरून त्यांची अनेकदा चेष्टा केली जाते. अनेकदा खाण्यावर संयम ठेवूनही अपेक्षित परिणाम साधला जात नाही. त्यांची खाण्याची वासना कमी होत नाही व शरीराचा आकारही कमी होत नाही. या प्रकारामागील वैज्ञानिक स्पष्टीकरण शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

अमेरिकेतील नॅन्सी पुझीफेरी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन ओबेसिटी नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी १५ अतिलठ्ठ  महिला आणि १५ कृश महिला यांच्या मेंदूतील रासायनिक बदलांचा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) वापरून अभ्यास केला. लठ्ठ महिलांचा बॉडी मास इंडेक्स ३५च्यावर होता, तर कृश महिलांचा बीएमआय २५पेक्षा खाली होता. दोन्ही गटांतील महिलांच्या मेंदूंचे जेवणाआधी आणि नंतर चित्रण करण्यात आले. कृश महिलांच्या मेंदूतील ठरावीक भागात जेवणानंतर भुकेचे संकेत मिळाले नाहीत, तर लठ्ठ महिलांच्या मेंदूतील भुकेशी संबंधित भाग जेवल्यानंतरही भूक लागल्याचे संकेत देत होता. लठ्ठ महिलांना जेवणानंतर खाद्यपदार्थाची नुसती चित्रे दाखवली तरी त्यांच्या मेंदूत भूक लागल्याचे संकेत तयार होत होते.

दोन्ही गटांतील महिलांच्या मेंदूंच्या निओ आणि लिंबिक कॉर्टेक्स या भागांत भुकेल्या असताना समानच प्रतिक्रिया दिसल्या. जेवणानंतर कृश महिलांच्या मेंदूतील अभिक्रिया मंदावल्या होत्या, पण लठ्ठ महिलांच्या मेंदूतील भुकेशी संबंधित भाग अद्याप क्रियाशीलच होता. म्हणजेच जेवणानंतर कृश महिलांच्या मेंदूतील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि पोस्टेरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स या भागांमधील अभिक्रिया मंदावल्या होत्या, तर लठ्ठ महिलांच्या मेंदूतील या भागांत अद्याप कृती घडतच होती. त्यामुळेच त्यांना जेवणानंतरही भूक शमल्यासारखे वाटत नव्हते. यातूनच त्यांचे सतत खाणे सुरू राहून लठ्ठपणा कमी न होण्याचा परिणाम होतो, हे या अभ्यासातून संशोधकांच्या लक्षात आले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)