सुट्टय़ांच्या चाहुलीबरोबर सहलींच्या योजना सुरू होतात. अशावेळी घरातील पाळीव सदस्यांना सांभाळण्यासाठी शेजारी किंवा नातावाईकांना गळ घालायचे दिवस आता संपले आहेत. आपण सुट्टीची मजा घेत असताना घरातील श्वान किंवा मांजर यांचे काय करायचे असा प्रश्न पडूच नये, इतके पर्याय बाजारपेठेने उपलब्ध करून दिले आहेत. सुट्टीच्या काळात प्राण्यांना पाळणाघरात ठेवण्याचा गेल्या काही वर्षांत फोफावलेला ट्रेंडही आता बदलू लागला आहे. पाळीव प्राण्यांना पाळणाघरात आपल्या नजरेपासून लांब ठेवण्याऐवजी त्याच्यासह सहलीची मजा घेण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. त्यासाठी सहलीची आखणी करून देणाऱ्या कंपन्या आवजूर्न पॅकेजेसही बाजारात आणू लागल्या आहेत. त्याशिवाय अगदी रेल्वे, विमान अशा सार्वजनिक वाहतुकीचे पर्यायही पाळीव प्राण्यांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे या नवसाथीदारासह अगदी परदेश प्रवासाची मजा घेणेही आता शक्य आहे.

विमान प्रवास

जेट, एअर इंडिया यासह इतरही काही कंपन्या प्राण्यांचीही वाहतूक करतात. मात्र विमानात प्राण्याला सोबत ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे १० महिन्यांपेक्षा लहान प्राण्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येत नाही. विमानातील सामानाबरोबर प्राण्यांचे पिंजरे ठेवले जातात. असे असले तरीही त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजीही विमान कंपन्यांकडून घेतली जाते. प्राण्याचे वजन, पिंजऱ्याचा आकार यावर त्यांच्या प्रवासाचे शुल्क अवलंबून असते. प्राण्यांना बेशुद्ध करूनच विमान प्रवास करणे सोयीचे असल्याचा गैरसमज बहुतेक प्राणीपालकांमध्ये दिसून येतो. मात्र योग्य काळजी घेतली, योग्य प्रकारचे पिंजरे असल्यास प्राण्यांना बेशुद्ध करण्याची आवश्यकता भासत नाही.

प्रवासापूर्वी प्राण्यांना आवश्यक त्या सर्व लसी दिल्याचे पशुवैद्यकांचे प्रमाणपत्र आवश्यक असते. प्राण्यांना बरोबर घेऊन प्रवास करणार असल्याची विमानतळाचे अधिकारी आणि विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना किमान दोन दिवस आधी कल्पना देणे आवश्यक आहे. प्राण्यांसाठीचा पिंजरा विमान कंपनीने दिलेल्या निकषांनुसार असणे गरजेचे आहे. विमानात बसल्यावर कॅप्टन किंवा विमानातील साहाय्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामानाबरोबर प्राणी असल्याची माहिती द्यावी. जेणेकरून सामान ठेवण्यात येत असलेल्या भागातील तापमान, हवेचा दाब या गोष्टींचे नियंत्रण केले जाईल. प्राण्याचा पिंजरा लोड करण्यात आला आहे याची खात्री करावी. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी साधारण दोन तास आधी प्राण्याला पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. प्रवासात काही तासांचा खंड असेल, तर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने प्राण्याला फिरवून आणावे. प्रवास संपल्यावर सर्वात आधी प्राण्याचा पिंजरा ताब्यात घ्यावा. पिंजऱ्यावर तुमचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक लिहिलेला असावा.

रेल्वे प्रवास

देशातील एखाद्या ठिकाणी प्राण्याला घेऊन जाण्यासाठी रेल्वे हा अधिक सोयीचा पर्याय आहे. पहिल्या श्रेणीचा वातानुकूलित किंवा साध्या डब्यातून प्राण्यांना बरोबर घेऊन प्रवास करायला परवानगी असते. मात्र त्यासाठी आधी तिकीट काढलेले असणे आणि रेल्वे प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. रेल्वे प्रवासासाठीही प्राण्याला सर्व लसी दिल्याचे पशुवैद्यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. दुसऱ्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना प्राण्याला बरोबर नेता येत नाही. मात्र सामानाच्या डब्यातून प्राण्यांच्या पिंजऱ्याची वाहतूक केली जाते. श्वान खूपच मोठा असेल, तर ज्या प्रमाणे घोडय़ांसाठी स्वतंत्र डब्याची सोय असते, तसा स्वतंत्र डबाही जोडता येतो. या सगळ्या सुविधांसाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. रेल्वे प्रवासादरम्यान प्राण्यांच्या खाण्या-पिण्याची काळजी त्याच्या पालकालाच घ्यावी लागते. पूर्व नोंदणी न करता किंवा तिकीट न काढता प्राण्याला प्रवासासाठी नेणाऱ्या पालकांना दंड आकारण्यात येतो.

कार मधून प्रवास

कारमधून प्रवास करताना एसी लावण्यात आला असला, तरी हवा खेळती असेल याचीही काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे कारमधील प्रवास अनेक प्राण्यांना आवडत नाही. त्यांना ‘मोशन सिकनेस’ होऊ शकतो. अशावेळी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने त्यांना काही औषधे देता येतात. प्रवासादरम्यान प्राण्यांना ‘सिटबेल्ट्स’ लावणे आवश्यक आहे. बाजारात प्राण्यांसाठी अनेक प्रकारचे सिटबेल्ट्स मिळतात. अगदी दोनशे रुपयांपासून हजार रुपयांपर्यत त्याच्या किमती आहेत. कारने खूप वेळ सलग प्रवास करू नये, साधारण दीड-दोन तासांनंतर मधे खंड घेऊन प्राण्यांना फिरवून आणावे. मात्र अनोळखी ठिकाणी फिरवताना श्वानाला पट्टा बांधूनच फिरवणे आवश्यक आहे. प्राणी खिडकीतून बाहेर डोके काढणार नाही याची काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत बंद गाडीत प्राण्याला एकटे सोडू नये.