उद्या म्हणजेच २ जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सुरपरमून दिसणार आहे. याआधी मागील महिन्यातच सुपरमून दिसला होता. १ जानेवारीला रात्री म्हणजेच २ जानेवारीच्या पहाटे ३ वाजून ३४ मिनीटांनी दिसणार आहे. हा चंद्र आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकणार आहोत असे नेहरु तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आला तर त्याला ‘सुपरमून’ म्हटले जाते. चंद्राची कक्षा लंबवर्तुळाकार असते, दर महिन्यात चंद्र काही काळ पृथ्वीच्या जवळ असतो तर काही काळ दूर जातो. मात्र अशाप्रकारे चंद्र पृथ्वीच्या जवळ येण्याच्या काळात पौर्णिमा आल्यास चंद्राचा आकार मोठा दिसतो त्याला सुपरमून म्हटले जाते.

ही घटना वर्षातून एकदा किंवा दोनदा होते. मात्र त्याचा नेमका कालावधी फार आध सांगता येत नाही. यावेळी चंद्र १४ टक्क्यांनी मोठा दिसतो. तसेच त्याचा प्रकाशही ३० टक्क्यांनी वाढलेला असतो असेही परांजपे यांनी सांगितले. यानंतरचा सुपरमून नेमका कधी दिसेल सांगता येत नाही. त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५६ हजार किलोमीटर अंतरावर येणार असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. एरवी चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. परंतु मंगळवारी तो जवळ येणार असल्याने सुपरमून दिसेल.

तुम्हाला सुपरमून पहायचा असल्यास त्याचा उदय आणि अस्त यावेळी तो अतिशय उत्तम दिसतो, त्यामुळे सुपरमून पाहण्याची ही उत्तम संधी आहे. मात्र मुंबईमध्ये सध्या ढग असल्याने हे सुंदर दृश्य दिसण्याची शक्यता कमी आहे. याआधी १४ नोव्हेंबर २०१६ आणि ३ डिसेंबर रोजी सुपरमून दिसला होता. त्यानंतर आता वर्षाच्या सुरुवातीलाच तो आपल्याला दर्शन देणार आहे.