वेळीच उपाययोजना करण्याचा ‘ओईसीडी’चा इशारा

युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या बहुसंख्य औषधांना दाद देत नसलेले जिवाणूशी (सुपरबग असे त्याचे नामकरण झाले आहे) मुकाबला करण्याची तयारी या देशांनी केली नाही तर, या देशांतील लाखो लोक त्याचे बळी ठरतील, असा इशारा बुधवारी तज्ज्ञांनी दिला.

प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर थांबवला नाही तसेच पायाभूत रुग्णालयीन सेवा सुधारल्या नाहीत, तर सार्वजनिक आरोग्य सेवा आणि त्यासाठीच्या आर्थिक तरतुदीला प्रचंड फटका बसेल असा इशाराच आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेने (दी ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट अर्थात ओईसीडी) दिला आहे.

या आठवडय़ात प्रसिद्ध झालेल्या एका वेगळ्या अभ्यास अहवालानुसार, औषधांचा परिणाम होत नसलेल्या जिवाणूमुळे २०१५ मध्ये युरोपमध्ये ३३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ‘ओईसीडी’च्या अहवालात म्हटले आहे की, २०५० पर्यंत ‘सुपरबग’मुळे २४ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. यावरील उपचारांचा खर्च प्रत्येक देशात वार्षिक ३५० कोटी अमेरिकन डॉलर (किंवा ३०० कोटी युरो) पर्यंत वाढू शकतो.

‘ओईसीडी’च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील मायकेल सेचिनी यांनी सांगितले की, या देशांमध्ये आताच त्यांच्या आरोग्य सेवेवरील एकूण तरतुदीच्या १० टक्के निधी हा औषधांना प्रतिसाद न देणाऱ्या रोगजंतूंवर उपचार करण्यात खर्च होत आहे. हे उपचार फ्लू, एचआयव्ही आणि क्षयरोगावरील उपचारांपेक्षाही महागडे आहेत. समस्येवर उपाययोजना केली नाही तर, हा खर्च आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.