बदलत्या काळानुसार आपल्या व्यक्तीमत्वात बदल करणे गरजेचे झाले आहे. स्वत:ला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करायचे असल्यास चांगले दिसणे आवश्यक असते. त्यामुळे शरीरावरील वाढलेली चरबी वेळीच कमी करणे गरजेचे ठरते. मात्र, शरीरावरील चरबी कमी करणे म्हणजे एका दिव्यातूनच जावे लागते. त्यातच जर पोटाचा घेर सुटला असेल तर मग विचारायलाच नको. कितीही व्यायाम, डाएट केलं तरी हे पोट नियंत्रणात येत नाही. त्यामुळे डाएट करण्यापेक्षा आहारातच अशा काही पदार्थांचा समावेश करा ज्यांच्या सेवनाने शरीरातील मेदाचे प्रमाण आपोआप नियंत्रणात येईल. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करण्यात येणा-या त्या गोष्टी नेमक्या कोणत्या जाणून घेऊयात..

१. सफरचंद – फळांमध्ये आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे सफरचंद. सफरचंदापासून अनेक पदार्थ करता येतात. यात ज्युस, जॅम, मिल्कशेक यासारख्या पदार्थांमध्ये सफरचंदाचा वापर करण्यात येतो. सफरचंद लाल आणि हिरव्या अशा दोन रंगामध्ये उपलब्ध असतात. या दोघांमध्ये असलेले पोषकद्रव्यांचे प्रमाणही थोड्याफार प्रमाणात सारखीच असतात. सफरचंदामध्ये डाइट्री फायबर, फ्लॅवोनोईडस, बेटा केरोटीन आणि फायटोस्टेरॉल  यांचे प्रमाण असते. सफरचंदामध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही पोषकद्रव्ये भूक नियंत्रित करतात. तसेच त्याच्यातील पेक्विट वाढते वजन कमी करण्यास मदत करते त्यामुळे दिवसातून एकदा तरी सफरचंदाचे सेवन करायला पाहिजे.

२. अंडी – अंडी अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. केक, पेस्ट्रीज यासारख्या पदार्थांमध्ये हमखास अंड्याचा समावेश करण्यात येतो. अंड केवळ चवीला चांगलं नसून त्यांचे इतरही काही गुणधर्म आहेत. अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील कॅलरीज कमी होतात. अंड्याच्या सेवनामुळे वजन नियंत्रणात राहण्याबरोबरच वाढते वजनही प्रमाणात राहते.

३.  पालक – नावडतीची भाजी म्हणजे पालक. अनेक जण पालकाची भाजी बघून नाकं मुरडतात मात्र या पालकाचे गुणधर्म बघितल्यानंतर नावडता पालकही आवडता होईल. पालकामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. पालकातील  फायबर पोटावरील चरबी कमी करतात. तसेच पालकाच्या सेवनाने भूक नियंत्रणात राहते.  त्यामुळे पोटावरील फॅट हळूहळू कमी होण्यास मदत होते.

४. अ‍ॅव्होकॅडो – बेली फॅट अर्थात पोटावर जमा झालेली अतिरिक्त चरबी. पोटाचा वाढलेला घेर कमी करण्यासाठी अ‍ॅव्होकॅडो या फळाचा उपयोग होतो. अ‍ॅव्होकॅडोमध्ये लेसिथिन अमीनो अॅसिड असते. या लेसिथिन अमीनो अॅसिडमध्ये शरीरातील मेदाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. त्याप्रमाणेच अ‍ॅव्होकॅडोत फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे याचे सेवन केल्यानंतर पोट भरते आणि दीर्घकाळापर्यंत भूक लागत नाही. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये अ‍ॅव्होकॅडोचा समावेश असणे फायद्याचे ठरेल.

५.  काकडी – उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक खाल्लं जाणारं फळ म्हणजे काकडी. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्याचबरोबर शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्याचं कामही काकडी करत असते. त्यामुळे शरीरातील थकवा घालविण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते.काकडीच्या सेवनामुळे शरीरातील विषारीद्रव्य शरीराबाहेर टाकले जातात. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडल्यामुळे रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्यामुळे पोटावरील चरबी आपोआप कमी होण्यास मदत होते. त्यामुळे व्यायामाबरोबरच या पदार्थांचा आहारात समावेश केला तर पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास नक्कीच मदत होईल.