प्रदूषण हेच प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे

भक्ती बिसुरे, लोकसत्ता

पुणे : राज्यात थंडीचे आगमन होताच हवामान बदलातून दिसणारे विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना कायम स्वरूपी दमा (अस्थमा) नाही त्यांना देखील या काळात दम्यासारखी लक्षणे दिसत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे.

थंडीच्या दिवसात कोरडे हवामान आणि हवेतील गारठा यांमुळे विषाणूजन्य आजार, ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. हे दुखणे संसर्गजन्य असल्यामुळे आजारी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, तसेच पूर्ण बरे वाटेपर्यंत घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला  डॉक्टर देतात. शहरात सुरू असलेली मेट्रो तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामे, त्यांमुळे असलेले धुळीचे साम्राज्य देखील याला कारणीभूत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने म्हणाले, ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांवर औषधोपचार केल्यानंतर देखील खोकला, श्वासोच्छ्वासास होणारा त्रास ही लक्षणे बराच काळ कायम राहातात. अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणे दमासदृश असतात, त्यावेळी त्यांना छाती विकार तज्ज्ञाचा सल्ला  घेण्यासाठी पाठवले जाते. धूळ, धुळीतील काही विशिष्ट कण यांमुळे असा त्रास होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला  घेण्यास विलंब करू नये.

लहान मुलांचे श्वसन रोग तज्ज्ञ डॉ. संजय मानकर म्हणाले, ज्या रुग्णांना कायम स्वरूपी दमा नाही, त्यांच्यामध्ये देखील, हवामानातील बदलांप्रमाणे दमा सदृश लक्षणे दिसतात. याला वैद्यकीय भाषेत आम्ही इंटरमिटंट अस्थमा असे म्हणतो. वातावरणातील बदल, थंडी, हवेत प्रदूषण निर्माण करणारे घटक यांमुळे हा दमा उद्भवतो. इतर वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत, या रुग्णांसाठी देखील इन्हेलरमधून दिले जाणारे औषध उपयुक्त ठरते. त्यांच्यासाठी ब्राँकोडायलेटर्स प्रकारातील इन्हेलर, डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतले असता त्यांना त्वरित आराम मिळतो. हवेतील प्रदूषण निर्माण करणारे घटक अत्यंत सूक्ष्म असल्याने मास्कसारख्या गोष्टींचा उपयोग या रुग्णांना होत नाही. त्यामुळे अति प्रदूषित ठिकाणी न जाणे, घर किंवा कार्यालयाच्या परिसरात बांधकामे सुरू असतील तर ती धूळ आपल्यापर्यंत येणार नाही याची काळजी घेणे हाच प्राथमिक उपाय करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.