News Flash

तिबेटमधील कर्करोगरोधी औषधीला कृत्रिम पर्याय उपलब्ध

चीनमधील क्विंघाय-तिबेट पठारी प्रदेशात ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ नैसर्गिकरीत्या आढळते.

| September 11, 2016 01:23 am

चीनमधील तिबेटच्या उंच पठारी प्रदेशात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ नावाच्या औषधीला चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम पर्याय शोधून काढला आहे. या औषधीत कर्करोगविरोधी गुणधर्म असून शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासही ती उपयोगी आहे.

चीनमधील क्विंघाय-तिबेट पठारी प्रदेशात ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ नैसर्गिकरीत्या आढळते. त्याला स्थानिक भाषेत ‘विंटर वर्म’ किंवा ‘समर ग्रास’ या अर्थाच्या नावाने ओळखले जाते. ‘ऑफिओकॉर्डिसेप्स सायनेन्सिस’ नावाची बुरशीची प्रजाती घोस्ट मॉथ नावाच्या पतंगाच्या अळ्यांमध्ये परजीवी म्हणून वाढते. नंतर अळी मरून त्याचा सुरवंटासारखा दिसणारा फळसदृश भाग तयार होतो. त्यालाच ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ म्हणतात. तिबेटमध्ये त्याचा स्थानिक औषधींमध्ये पूर्वापार वापर होत आला आहे. आधुनिक विज्ञानाला त्याच्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढून किंमतही भलतीच वाढली. अगदी डोंगराळ प्रदेशातील लहान गावांतही त्याला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळते. मात्र या औषधीच्या वाढीचा वेग अतिशय मंद असून तिची व्यापारी उद्देशाने शेती करणे आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळे औषध उत्पादन कंपन्यांना कच्च्या मालाच्या पुरवठय़ासाठी या प्रदेशात अल्प प्रमाणात मिळणाऱ्या औषधीवरच अवलंबून राहावे लागते. औषधीसाठी प्रमाणाबाहेर जमीन खणल्याने स्थानिक पर्यावरणही धोक्यात आले आहे.

मात्र गेल्या ११ वर्षांच्या संशोधनाअंती चिनी शास्त्रज्ञांनी या दुर्मीळ औषधीला कृत्रिम पर्याय निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॅटरपिलर फंगसमधील अनावश्यक भाग काढून टाकून ‘कॉर्डिसेप्स सायनेन्सिस’ किंवा ‘हिर्सुटेला सायनेन्सिस’ हा उपयुक्त भाग वेगळा काढला आणि त्याची वाढ केली. अशा प्रकारे कृत्रिमरीत्या तयार केलेली औषधी व नैसर्गिक औषधी याच्या डीएनएमध्ये ९७ टक्केसाम्य आढळले. तसेच मूळ औषधी गुणधर्मही सारखेच राहिले. अशा प्रकारे किण्वन (फरमेंटेशन) प्रक्रियेद्वारे कॅटरपिलर फंगसची भुकटी तयार करण्यास चिनी सरकारने तांत्रिक व आर्थिक साहाय्य पुरवले. प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती केलेल्या औषधातून २० दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे वर्षांला २०० टन औषधी तयार करण्याचे या प्रकल्पांतर्गत उद्दिष्ट आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2016 1:23 am

Web Title: synthetic options available on cancer drug
Next Stories
1 फॅशनबाजार : ‘बॅग’वतीचा सोस!
2 भारतात आरोग्यविषयक मनुष्यबळाची कमतरता
3 ही आहेत कर्करोगाची काही लक्षणे
Just Now!
X