भारतीय वंशाच्या संशोधकांनी डेंगूचे भाकीत दोन ते तीन आठवडे आधीच अचूकपणे वर्तवणारी हॉटलाइन विकसित केली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या हॉटलाइनवर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींचे विश्लेषण करून त्यांनी यंत्रणा विकसित केली आहे.

साथीच्या आजारांच्या धोका आधीच ओळखण्यात अपयश आल्याने विकसनशील देशांमध्ये दर वर्षी हजारो जण दगावतात. त्यामुळे ही यंत्रणा फायदेशीर ठरेल असे न्यूयॉर्क विद्यापीठातील लक्ष्मीनारायणन सुब्रमणियन यांनी स्पष्ट केले. आमचे हे तंत्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दूरध्वनी यंत्रणेच्या आधारे आजार शोधण्याच्या या पद्धतीमुळे दोन ते तीन आठवडे आधीच भाकीत केल्याने साथीच्या आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या हॉटलाइनवर येणारे फोन लक्षात घेऊन प्रत्येक भागात किती रुग्ण आहेत याचा आढावा घेऊन हा अंदाज वर्तवता येतो असे संशोधकांनी सांगितले.

प्रत्येक भागात जाऊन नमुने गोळा करण्यापेक्षा आलेल्या तक्रारींच्या आधारे व त्यावर लोकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता हा तपशील वापरून संभाव्य आजार रोखण्यासाठी उपयोगी पडतो असे पाकिस्तानमधील पंजाब माहिती तंत्रज्ञान मंडळाचे अध्यक्ष उमर सैफ यांनी सांगितले. विकसनशील देशांमध्ये अशा हॉटलाइन महत्त्वाच्या ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा स्वरूपाचा आगाऊ इशारा दिल्यास शहर किंवा त्या संबंधित गावाला उपाययोजना करणे शक्य होईल असे न्यूयॉर्क विद्यापीठातील नबील अब्दुर रहमान यांनी स्पष्ट केले. न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी २०११ मध्ये आलेल्या साथीच्या आजारानंतर  आरोग्य विषयक हॉटलाइनवर आलेल्या तीन लाख फोनच्या आधारे हे भाकीत वर्तवले. त्याचे अंदाज मिळतेजुळते होते.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)